खासदार दत्तक गावात अखेर मोबाईलची ट्रिंग ट्रिंग; बीएसएनएलचा टॉवर मात्र अद्यापही धूळखात 

किकवारी बुद्रुक (जि.नाशिक) : बागलाण तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील पर्यटनस्थळ साल्हेर भागात खासगी मोबाईल कंपनीचा टॉवर सुरू झाला असून, या भागात नेटवर्क सुरू झाल्याने मोबाईलवर ट्रिंग ट्रिंग अखेर सुरू झाले आहे. यामुळे कित्येक वर्षांत बाहेरगावी संपर्कासाठी आसुसलेल्या ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

सालेर किल्ला परिसरात पायरपाडा, भिकारसोंडा, साळवण महारदर, छोटा महारदर, सावरपाडा, वग्रीपाडा, घुळमाळ, भाटंबा, केळझर, तताणी, बारीपाडा आदी गावांत कित्येक वर्षांपासून कुठल्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क नव्हते. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या भागांत मोबाईल टॉवर सुरू करावा, यासाठी बागलाण पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर बच्छाव यांनी १ मार्च २०१९ ला उपोषणाचा इशाराही दिला होता. मात्र सटाणा बीएसएनएल मंडल अभियंता एस. आर. पवार यांनी लेखी कळविलेल्या अडचणींमुळे बच्छाव यांनी उपोषण मागे घेतले होते.

खासदारांनी दत्तक घेतले होतं गाव..

माजी संरक्षण राज्यमंत्री व आताचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी समृद्ध ग्राम योजनेंतर्गत हे गाव दत्तक घेतले होते. साल्हेर येथे दहा वर्षांपासून बीएसएनएल टॉवरचा सांगाडा उभा आहे. त्याचे उद्‍घाटन खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले. तरीही बीएसएनएल टॉवर सुरू झाला नाही. त्यामुळे बागलाण तालुक्यातील साल्हेर पट्ट्यातील गावांमध्ये टॉवरसाठी माजी पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव यांनी प्रयत्न केले. अखेर येथे मोबाईल नेटवर्क मिळाल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून आला. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

साल्हेर येथे जिओ कंपनीच्या टॉवरसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. अखेर आम्ही करार पद्धतीने जागा देऊन या भागातील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न मार्गी लावला. 
- राणी भोये, सरपंच, साल्हेर 

साल्हेर हे पर्यटनस्थळ असल्याने या भागात महाराष्ट्रसह अनेक राज्यांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मोबाईल नेटवर्क नसल्याने मोठा त्रास होता. मात्र आता टॉवरमुळे नेटवर्क मिळत असल्याने पर्यटकांत आनंदाचे वातावरण आहे. 
- भास्कर बच्छाव, माजी पंचायत समिती सदस्य, बागलाण 

 हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा