
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये देशातील सरकार बदलेल. कारण कोणतेही सरकार कायम नसते. त्यावेळी सर्वांचा हिशेब चुकता केला जाईल, असा सज्जड दमच शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला आहे.
नाशिक येथील खासगी कार्यक्रमानिमित्त नाशिक येथे आलेल्या राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आयएनएस विक्रांतचे पैसे राजभवनमध्ये गेल्याचे सांगितले जाते. तर राजभवन त्यास नकार देत आहे. यामुळे हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे. किरीट सोमय्या यांना देण्यात आलेल्या क्लीन चिटवर आक्षेप नोंदवत यांनाच क्लीन चिट कशी मिळते, असा प्रश्न करत आमच्या लोकांना मात्र क्लीन चिट मिळत नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक सीमाप्रश्न तसेच राज्यातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असून, लोकशाही मार्गाने निघणाऱ्या आंदोलनात सरकारने आडकाठी आणू नये. मोर्चा काढू नये, असे वाटत असेल तर भाजपने राज्यपालांना तेव्हाच हटवायला पाहिजे होते. भाजपच्या प्रवक्त्यांवर कारवाई व्हायला हवी होती. आयएनएस विक्रांतसंदर्भात पैसे गोळा झाले आणि त्यातून पैशांचा अपहार झाल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला.
मोर्चा लोकशाही मार्गाने काढण्यात येणार असून, मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या दैवतांचा अपमान करत असेल तर सरकारने त्यांचे समर्थन न करता कारवाई करायला हवी, अशी सूचनावजा मागणी खासदार राऊत यांनी केली.
हेही वाचा:
- Most Search Asian Celeb : गुगलवर उर्फी जावेद सर्वाधिक सर्च, सारा-जान्हवी-कियारालाही टाकले मागे
- मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवा सुरू, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराशी जोडणार
- कोल्हापूर : औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावल्याने तरूणांचा बिर्याणी हाऊसमध्ये राडा
The post खासदार संजय राऊत : सर्वांचा हिशेब २०२४ मध्ये चुकता करणार appeared first on पुढारी.