Site icon

खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी आज सोमवार, दि.9 अखेर खुर्चीला नतमस्तक होत पदभार सोडला आहे. मनपाचे आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडे त्यांनी रविवार, दि.8 महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांचा आढावा मांडला. आता एक वर्षासाठी महापौर पदाच्या शर्यतीत इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. त्यामुळे आगामी महापौरपदाची माळ महिला नगरसेविकाच्या गळ्यात पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे महापौर पदासह महत्त्वाचे सर्व विषय समित्यांवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे. दरम्यान धुळे महानगरपालिकेच्या 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत महापौर पदाचा कार्यकाळ ठरवण्यात आला. त्यानुसार दुसरी टर्म प्रदीप कर्पे यांना मिळाली. मात्र अनुसूचित जातीच्या उमेदवाराला अद्यापही या पदावर संधी मिळाली नसल्याने फेर आरक्षणाची मागणी करत हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. त्यामुळे प्रदीप कर्पे यांना काही काळ पायउतार व्हावे लागले. मात्र त्यानंतर राजकारणाचे आणि न्यायालयाच्या आदेशाची संकट टळल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने पुन्हा कर्पे यांनाच संधी मिळाली. मात्र आता महानगरपालिकेचा कार्यकाळ डिसेंबर-2023 मध्ये संपणार असल्याने शेवटच्या वर्षात पुन्हा नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यानुसार कर्पे यांना राजीनामा देण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार काल त्यांनी आपला राजीनामा आयुक्त यांच्याकडे सोपवला. तर आज पत्रकार परिषदेत त्यांनी खुर्चीला नतमस्तक होत आपला पदभार सोडला आहे. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. यात धुळे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पांतून हनुमान टेकडीपर्यंत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतेचा वादग्रस्त ठेका रद्द करून आता नव्याने प्रत्येक प्रभागात घंटागाडीचे यशस्वी नियोजन केल्याचे श्रेय देखील त्यांनी घेतले आहे. आता शेवटच्या एक वर्षासाठी महापौरपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी महापौर पदाच्या शर्यतीत भाजपाच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांच्यासह स्थायी समितीच्या माजी सभापती बालीबेन मंडोरे यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जाते आहे.

हेही वाचा:

The post खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच appeared first on पुढारी.

Exit mobile version