खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार

Police Bharati

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलिस दलातील रिक्त जागांची भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त असलेल्या पदांवर पोलिस भरती होत आहे. त्यानुसार राज्यात १४ हजारांपेक्षा अधिक पदे भरण्यात येणार असल्याचे गृह विभागाने जाहीर केले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती बुधवारी (दि. ९) पोलिस दलातर्फे जाहीर होणार आहे. तसेच अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार आहे.

राज्यात २०१९ पासून भरती प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे तीन वर्षे रिक्त झालेल्या पदांची भरती आता होत आहे. त्यामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनामुळे रोजगार घटल्याने बारावी उत्तीर्ण उमेदवारांसहित उच्चशिक्षित उमेदवारांकडून पोलिस भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी होत होती. त्यासाठी शारीरिक, मैदानी सरावासह अभ्यासावर राज्यभरातील हजारो उमेदवारांनी तयारी केली आहे. या भरती प्रक्रियेच्या पहिला टप्पा बुधवारपासून सुरू होणार असून, नाशिक ग्रामीण दलात १६४ पोलिस शिपाई आणि १५ चालकांची भरती होणार आहे. तर, नाशिक पोलिस आयुक्तालयात सलग दोन वर्षे आंतरजिल्हा बदल्यांमुळे रिक्त पदे नसल्याने यावर्षी शहरात भरती होणार नाही. यामुळे नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची पसंती नाशिक ग्रामीणसह सर्वाधिक जागा असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, लोहमार्ग मुंबई येथे असल्याचे दिसून येत आहे.

अशी समजेल माहिती…

अर्ज नोंदणीचे संकेतस्थळ बुधवारी (दि.९) सुरू होणार आहे. त्यानुसार उमेदवारांना www.mahapolice.gov.in आणि www.policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळांवर संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक अर्हता, आरक्षण, परीक्षा शुल्क आदी माहितीसह जिल्हानिहाय रिक्त जागांची माहिती उमेदवारांना समजेल.

हेही वाचा:

The post खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार appeared first on पुढारी.