खुशखबर : बेरोजगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार

दिव्यांग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेमार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने जाचक ठरणार्‍या अटी रद्द करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार आता 18 ते 40 वर्षांच्या बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्याचा लाभ मिळणार असून, दरमहा तीन हजार रुपये दिव्यांगांच्या खात्यात जमा होणार आहे.

‘प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्य’ योजनेचे नाव बदलून ‘बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्य योजना’ असे करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांगांना दरमहा दिल्या जाणार्‍या दोन हजार रुपयांमध्ये एक हजारांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात समाजकल्याण विभागाचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मनपाच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी दहा कल्याणकारी योजना राबविल्या जातात. काही जाचक अटींमुळे अनेक दिव्यांगांना या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी राखीव असलेला निधीही खर्च होत नसल्याने जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या योजनेत मूलभूत बदल करण्याचा प्रस्ताव तत्कालीन उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी तयार केला असून, मेनकर दोन दिवसांपूर्वीच मनपा सेवेतून निवृत्त झाले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून प्रौढ बेरोजगार दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य योजना राबविली जाते. या योजनेंंतर्गत 40 वर्षांवरील दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये दिले जातात. आता या योजनेंतर्गत 40 वर्षांवरील दिव्यांगांसाठी अट वगळण्यात आली असून, दिव्यांगांना दरमहा देण्यात येणार्‍या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

विवाहासाठीही एक लाख….
दिव्यांगांना आता मनपामार्फत विवाहासाठी एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तीने दुसर्‍या दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित जोडप्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे. विवाह झाल्याच्या तीन महिन्यांच्या आत अर्थसहाय्याकरिता अर्ज करावा लागणार आहे. अर्थसहाय्याच्या एक लाखातून 50 हजारांची रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवली जाईल. बचत प्रमाणपत्र किंवा पाच वर्षांची मुदतठेव पावती सादर केल्यानंतरच उर्वरित 50 हजारांची रक्कम दिली जाईल.

हेही वाचा:

The post खुशखबर : बेरोजगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार appeared first on पुढारी.