खोटा राजीनामा देऊन गोडसेंकडून समाजाची फसवणूक : सुधाकर बडगुजर

सुधाकर बडगुजर, हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायचा होता, तर तो त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे सोपविणे अपेक्षित होते. गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलेला राजीनामा म्हणजे मराठा समाजावर बेगडी प्रेम दर्शविणारे राजीनामा नाट्य आहे. केवळ समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी खोटा राजीनामा देऊन गोडसे यांनी समाजाची फसवणूक केली आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. (Maratha Reservation)

आरक्षणासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकप्रतिनिधींना मराठा समाजाने गावबंदी केली असून, आंदोलकांच्या भावना उग्र बनल्या आहेत. नाशिकमध्ये उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या खा. गोडसे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालत जाब विचारला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. यानंतर काही वेळाने खा. गोडसे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. नाशिकमध्ये मंगळवारी (दि.३१) मराठा समाजाने ठिकठिकाणी मूकमोर्चा, निदर्शने, उपोषण, रास्ता रोको आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. यामुळे नाशकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख बडगुजर यांनी खा. गोडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Hemant Godse Maratha Reservation)

बडगुजर म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी घेतलेल्या आंदोलनाच्या भूमिकेला सर्वसामान्य नागरिकही पाठिंबा देत आहेत. काही राजकीय पक्षांनीदेखील उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला असून, समाजाला आरक्षण मिळावे, अशी त्यांची भूमिका आहे. हेमंत गोडसे यांनी आपला खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. वास्तविक तो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर करणे अपेक्षित होते. परंतु मराठा समाजावर बेगडी प्रेम दर्शवणारे हे गोडसेंचे केवळ राजीनामा नाट्य आहे. समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटा राजीनामा देणे म्हणजे समाजाची फसवणूक करण्यासारखे असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. (Hemant Godse Maratha Reservation)

हेमंत गोडसे यांना खासदारकीचा खरोखर राजीनामा द्यायचा होता तर तो त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सोपवायला हवा होता. परंतु त्यांनी केवळ समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर करून बेगडी प्रेम दर्शविले आहे. खोटा राजीनामा देणे म्हणजे समाजाची फसवणूक आहे.

– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, ठाकरे गट

हेही वाचा :

The post खोटा राजीनामा देऊन गोडसेंकडून समाजाची फसवणूक : सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.