‘गटशेती प्रवर्तक’ प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; देशातला पहिला उपक्रम

नाशिक : अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीतील विविध आव्हानांचा एकत्रितपणे सामना करत धोके कमी करणे आणि शेतीला शाश्वतता आणत जोडव्यवसाय करणे, ही उद्दिष्टे समोर ठेवत प्रधानमंत्री कौशल विकास योजना दोन अंतर्गत देशात प्रथमच शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 

गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संस्थात्मक पातळीवर संघटित करण्यासाठी राज्यातील दोन लाख ८२ हजार शेतकऱ्यांना ‘गटशेती प्रवर्तक’ प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहे. प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणीची जबाबदारी सिमेसिस लर्निंग एलएलपी ही संस्था करीत आहे. उपक्रमाचे संनियंत्रण आणि मूल्यांकन करण्याची जबाबदारी पॅलेडियम इंडियाकडे आहे. या प्रशिक्षण प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यास ११ नोव्हेंबर २०२० पासून सुरवात झाली. अंतिम टप्प्यात पाच जिल्ह्यांतील २६ तालुक्यांमधील १२१ महसुली मंडळांचा समावेश आहे. 

२४ हजार २०० शेतकऱ्यांची नोंदणी

त्यातंर्गत सुमारे २४ हजार २०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. लखमापूर आणि वीरगाव (ता. बागलाण) येथील शेतकरी प्रशिक्षणात सहभागी झाले. मंडल समन्वयक विलास दळवी यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास आणि जागरूकता निर्माण झाली. प्रशिक्षक एम. बी. खरात व ए. के. शेडगे यांनी संवाद साधला. लखमापूरच्या प्रशिक्षणात नानाजी दळवी, शक्ती दळवी, केवळ दळवी, आण्णा आहेर, सागर दळवी, दीपक बच्छाव, चेतन बच्छाव, नितीन बच्छाव उपस्थित होते. वीरगावच्या प्रशिक्षणात सरपंच ज्ञानेश्‍वर देवरे, उत्तमदादा रौंदळ, श्रीहरी सोनवणे, वंदना खैरनार, सागर ठोके यांचा सहभाग होता. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ‘गटशेती प्रवर्तक’ प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. - विलास दळवी 

समविचारी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करायला हवी. उत्पादक कंपनी स्थापन करून शेतीचे व्यवसायात रूपांतर करायला हवे. हा मंत्र प्रशिक्षणातून मिळाला आहे. - शक्ती दळवी 

गटशेतीतून वैयक्तिक उत्पादन वाढवायला हवे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण फलदायी ठरणार आहे. - उत्तमदादा रौंदळ 

समविचारी गटस्थापना करताना गटशेतीचे फायदे समजावणे ही प्राथमिक गरज आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. - वंदना खैरनार  

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?