गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; जामनेरातील घटना

जळगाव : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; जामनेरातील घटना

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : गणपती बाप्पाचे विसर्जन करीत असताना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जामनेर शहरात आज (दि. ९) दुपारी घडली. एक लहान बालक पाण्यात बुडत असताना त्याला वाचविताना या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. किशोर राजू माळी (वय ३०) असे मयत युवकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, किशोर राजू माळी हा तरुण दुपारी दीडच्या सुमारास कांग नदीच्या पुलाखाली गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेला होता. यावेळी किशोरला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना दिसला, त्याला वाचविण्यासाठी किशोरने पाण्यात उडी मारली. त्या मुलाला त्याने वाचविले. परंतू, किशोरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

किशोरचा मृतदेह उपजिल्हारुग्णालयात आणण्यात आला. किशोरच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडिल,लहान भाऊ असा परिवार आहे. कांग नदी पात्रातून त्याचा मृतदेह काढण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

The post गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; जामनेरातील घटना appeared first on पुढारी.