गर्जना कृतीत उतरविली, जळगावची सत्ता घालविली! संजय राऊत यांचा गिरीश महाजन यांना टोला 

नाशिक : गर्जना करीतच नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवितो. गर्जना कृतीत उतरविली म्हणूनच गिरीश महाजन यांची जळगाव महापालिकेतील सत्ता घालविली, असा टोला शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संर्पक नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला. खासदार राऊत नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत केवळ गर्जनाच करतात, अशी टीका केली होती. त्याविषयी विचारले असता, त्यांनी गर्जना कृतीतही आणतो म्हणून त्यांची जळगावची सत्ता घालविली व त्यांना घरी बसविले, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. 

वाजतगाजत लोकशाही पद्धतीनेच नाशिक महापालिकेवर भगवा
ते म्हणाले, की नाशिकलाही जळगाव पॅटर्न करायचा होता; पण आता वाजतगाजत आणि लोकशाही पद्धतीनेच नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा महापौर करून भगवा फडकवू. त्यासाठी नाशिकला सहा स्थानिक नेत्यांची कोअर टीम केली जाणार आहे. लवकरच त्यांची नाव जाहीर केली जातील. जळगावला भाजपची लोकशाही होती. त्यांच्या लोकशाहीच्या पद्धतीने परतफेड केली आहे. जळगाव महापालिकेत घोडेबाजर झाल्याच्या आरोपाला त्यांनी उत्तर दिले. जळगावला घोडेबाजार झाला होता, तर पहाटेच्या वेळी शपथ विधी वेळी काय झाला होता, तोही घोडेबाजारच होता, असा आरोपही त्यांनी केला. 

शरद पवारांनी नेतृत्व करावे 
देशात सक्षम विरोधी पक्षाची आघाडी उभी राहावी, यासाठी यूपीए आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी करावे. ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी चांगलेच नेतृत्व केले. पण सध्या प्रकृतिअस्वस्थामुळे श्री. पवार यांनी नेतृत्व करावे. देशातील अनेक लहान- लहान घटक पक्ष यूपीए सरकारमध्ये येऊन यूपीएची ताकद वाढेल, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पश्चिम बंगालमध्ये एकट्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात महाभारत सुरू आहे. तेथे कदाचित भाजपच्या जागा वाढतीलही; पण सत्ता मात्र ममता बॅनर्जी यांचीच येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

सचिन वाझे प्रकरण राऊत म्हणाले....

सचिन वाझे चौकशी आणि मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीने पोलिस दलात नाराजी असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. ते म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. एखाद दुसऱ्या घटनेने पोलिस दलावर किंवा राज्य सरकारवर काहीही परिणाम होत नसतो. त्यासाठी केंद्राने ‘एनआयए’च काय; पण ‘केबीजी’ आणि ‘सीआयए’मार्फत चौकशी केली तरी फरक पडत नाही. कोरोनाबाबत राज्य सरकार जागरूक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग होत असल्यामुळेच महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या जास्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये लसीकरणाचे काम सुरू व्हावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलले तसेच हाफकिन इन्स्टिट्यूटलाही त्यांनी भेट दिली. 

स्मार्टसिटीच्या नावाने दरोडे 
नाशिक महापालिकेत स्मार्टसिटीच्या नावाने दरोडे सुरू आहेत. त्याची सगळी माहिती घेतली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत योग्य वेळी सगळी माहिती दिली जाईल. यावेळी संपर्कप्रमुख भाउसाहेब चौधरी, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, महानगपप्रमुख सुधाकर बडगुजर, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर, माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, शोभा मगर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.