नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील प्रमुख बाजारपेठ मेन रोड व परिसरात गर्दी नियंत्रणासाठी सशुल्क प्रवेशाचा मार्ग प्रशासकीय यंत्रणेने अवलंबला आहे. हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत असून, परिसरातील गर्दी नियंत्रणात येत आहे; परंतु ठराविक भागातच निर्बंध आणले जात असल्याने संबंधित परिसरातील व्यावसायिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. याची प्रचीती बुधवारी (ता. ३१) महात्मा गांधी मार्ग परिसरातील मोबाईल विक्री व्यावसायिकांच्या रूपाने आली. निर्बंधांच्या निषेधार्थ व्यावसायिकांनी काही वेळेसाठी दुकाने बंद ठेवली. एकतर संपूर्ण बाजारपेठेत पाच रुपये शुल्कासह प्रवेश ठेवा, अन्यथा कठोर लॉकडाउन लावावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
पाच रुपये प्रवेशाची सर्वत्र अंमलबजावणी, अन्यथा थेट लॉकडाउनची करा
मेन रोडसोबत महात्मा गांधी मार्ग व शहरातील अन्य ठिकाणांवर संभाव्य गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पाच रुपयांची पावती देताना प्रवेश दिला जात आहे. मर्यादित वेळेकरिता प्रवेश देताना जास्त वेळ वाया घालविणाऱ्यांवर करडी नजर ठेवत पाचशे रुपयांचा दंडदेखील केला जातो आहे. प्रशासकीय पातळीवर या निर्बंधांची व्याप्ती नियोजन आखताना वाढविली जाते आहे; परंतु सद्यःस्थितीत मर्यादित भागांमध्येच निर्बंध लादले असल्याने या परिसरातील व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. दुसरीकडे ज्या परिसरात निर्बंध नाहीत, अशा भागांमध्ये नागरिकांकडून खरेदीला पसंती दिली जाते आहे.
हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड
प्रधान पार्क परिसरात काही काळासाठी तणाव
महात्मा गांधी मार्गावर व्यावसायिकांमध्ये संघर्ष अनुभवायला मिळाला. येथील प्रधान पार्कमधील गाळ्यांकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर प्रशासनातर्फे पावती आकारण्यात येत होती. त्यामुळे नागरिक आता खरेदीसाठी न येता परिसरातील पलीकडच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी वळू लागल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली. यानंतर काही वेळेसाठी निषेध नोंदविताना व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. स्थानिक व्यावसायिक आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर व्यावसायिकांनी दुपारी उशिरा दुकान पुन्हा उघडले. प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कठोर उपाययोजना करत असून, माणूस म्हणून या निर्बंधांचा स्वीकार करायला हवा, अशी समजूतदारीची भूमिका व्यावसायिकांनी अवलंबली.
हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण
अन्य ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रणाचे आवाहन
मर्यादित भागात बॅरिकेडिंग करत गर्दी कमी करण्यात यश आले आहे; परंतु दुसरीकडे प्रमुख बाजारपेठेतील अन्य काही भागांमध्ये पावतीद्वारे प्रवेश नसल्याने तेथे गर्दी होताना दिसते. येत्या काही दिवसांमध्ये या परिसरांमध्येही होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन यंत्रणेपुढे असणार आहे.