गारपिटीच्या १८ तासानंतरही वितळल्या नाहीत गारा! निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हवालदिल

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : तळवाडे दिगर परिसरात रविवारी (ता. २१) सायंकाळी प्रचंड गारपीट झाल्याने तेथील कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्षरशः गारांचा फुटभर खच पडला होता. त्या गारा सोमवारी (ता. २२) १२ वाजता अठरा तासानंतरसुद्धा विरघळलेल्या नव्हत्या. अशी प्रचंड हानी झाल्याने तळवाडे दिगर येथील भवाडे रोड परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

सुरवातीपासूनच कांद्याचे रोप तयार करण्यापासूनच परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी निर्सगाच्या अस्मानी संकटाना तोंड देत होता. तीन ते चार वेळेस पाच हजार रुपये किलो दराने बियाणे, खते, औषध, मजूर, मशागत करून कांद्याच्या पिकाची आपल्या मुला-बाळापेक्षा जास्त काळजी घेऊन उशिरा का होईना रोप तयार करून कांदा लागवड केली. दर पंधरा दिवसांनी वातावरणातील बदलामुळे महागड्या फवारण्या करून कांदापिक जोमात तयार केले होते. लाखोंचे भांडवल जमिनीत ओतल्यानंतर चांगले उत्पन्न घेऊन दोन पैसे मिळतील, अशी आशा असताना पीक काढणीला आले. निसर्गाच्या लहरीपणाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

एका बाजूला कोरोनाचे भीषण संकट उभे, तर दुसरीकडे निर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कांदा भाजीपल्यासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्ही अस्मानी संकटांनी शेतकरी चांगलाच पिचला गेला आहे.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

अधिकाऱ्यांकडून प्रथमिक पाहणी

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकार्यांनी प्रत्येक शेतात भेट देऊन
कांदा, भाजीपाला, पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

चार महिन्यांपासून दिवसरात्र काबाडकष्ट करून लाखो रुपये जमिनीत ओतून पिक उभे केले होते. गारपिटीमुळे काही क्षणात होत्याच नव्हते झाले. आमचे पुढील वर्षाचे नियोजन कोलमडले आहे.
- संजय आहिरे, नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकरी

हेही वाचा - भय इथले कधी संपणार? नाशिकमध्ये विवाहितेसह चिमुरडीवर अत्याचार; भयंकर प्रकार 

निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील बहुतांश गावात मोठ्या प्रमाणत गारपीट झाली आहे. लवकर पंचनामे करून हेक्टरी २५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याविषयी लवकरच कृषिमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ.
- दिलीप बोरसे, आमदार बागलाण विधानसभा