गावची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सरपंच सभा! ग्रामविकास विभागाचा निर्णय

येवला (जि.नाशिक) : गाव पातळीवरील अनेक कामे मार्गी लावण्यासाठी सरपंचांना तालुकास्तरावर हेलपाटे मारावे लागतात. अनेकदा कामच मार्गी लागत नाहीत, याबाबतच्या तक्रारी वाढल्याने आता गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक तीन महिन्याला तालुक्यातील सरपंचांची सरपंच सभा घ्यावी असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.यामुळे रखडलेल्या कामांना चालना देणे सोपे होऊ शकणार आहे.

गटविकास अधिकारी घेणार आता तीन महिन्यांनी सभा 
सरपंच गाव पातळीवरील अनेक कामे विविध प्रस्तावांच्या माध्यमातून मंजुरीसाठी पाठवत असतात.अनेक कामांचा पाठपुरावाही पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर सुरू असतो. अनेकदा अधिकारी भेटत नसल्याच्या किंवा कामे मार्गी लागत नसल्याच्या समस्येला काही समस्यांना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे सरपंचांची अधिकाऱ्यांसोबत बैठकही कधी होत नसल्याने हक्काने समस्या कोणाकडे मांडाव्यात असा प्रश्न सरपंचांना होता.या संदर्भात अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्याने आता तालुका पातळीवर गट विकास अधिकाऱ्यावर सरपंचांच्या समस्या ऐकण्याची जबाबदारी शासनाने सोपविली आहेत.

सरपंच आणि ग्रामसेवकांची एकत्रितपणे चर्चा

गटविकास अधिकाऱ्यांनी आता ग्रामपंचायतीची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी तालुका पातळीवर तीन महिन्यातून एकदा सरपंच सभा घ्यायची आहे.या सभेत विस्ताराधिकारी यांच्यासह इतर कर्मचारी व अधिकारी व सरपंच आणि ग्रामसेवक एकत्रितपणे येऊन चर्चा करतील.विशेषता या बैठकीत कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारींची अधिकाऱ्यांनी सोडवणूक करावी असा यामागचा हेतू आहे. सभा घेतल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर करायचा असल्याने कामे मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांवरही दबाव राहणार आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी महसूल आयुक्तांना व आयुक्तांनी शासनाला हा अहवाल पाठवायचा असल्याने नक्कीच या सरपंच सभेचा गाव विकासाला लाभ होईल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

"सरपंच सभा घेण्याचा निर्णय गाव विकासाला हातभार लावणारा आहे.या निमित्ताने गावातील रखडलेल्या समस्या तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या समोर मांडता येणार असून त्यांची सोडवणूकही करणे सोपे जाईल.या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हायला हवी."-प्रवीण गायकवाड,सभापती,पंचायत समिती,येवला

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट