गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे जप्त; म्हसरूळ हद्दीतून कारसह दोघे ताब्यात 

म्हसरूळ (नाशिक) : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठ रोड परिसरातून दोघा संशयितांकडून गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच दोघा संशयितांसह कार ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील, शेवरे, गणेश रेहरे, चव्हाण, गुंबाडे, राठोड शनिवारी (ता.३०) सकाळी परिसरात गस्त घालत होते. पेठ रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएमजवळ मारुती झेन कार (एमएच-०४-डब्ल्यू-१२८८) संशयास्पद फिरताना आढळली. पोलिसांनी सापळा रचून संशयित मयूर ढवळे (वय २४, रा. सप्तरंग सोसायटी, पेठ रोड) व आशिष महिरे (२४, रा. शिवाजीनगर, सातपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती व मारुती झेन कारची तपासणी केली असता त्यात गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे, एक लाकडी दांडका आढळला. त्यांच्याकडून कारसह एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल