गावाच्या रक्षकाला आता कायद्याचे कवच! पोलिसपाटलाला मारहाण पडणार महागात

येवला (जि. नाशिक)  : पोलिसांचा गावातील विश्‍वासू घटक आणि गावासाठी पोलिस व प्रशासनातील दुवा असणारा गावचा पोलिसपाटील तसा गटबाजीच्या राजकारणातही होरपळून निघतो. मात्र, आता तसे होणार नाही. कारण गावाच्या या रक्षकाला कोणी हात लावल्यास थेट शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. कायद्याचे हे कवच मिळाल्याने आता पोलिसपाटील अधिक धिटाईने काम करू शकणार आहे. 

थेट गुन्हा दाखल होणार

पोलिस विभागाचा आत्मा समजला जाणारा गावपातळीवर कायदा सुव्यवस्थेचे काम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पोलिसपाटील. गावातील कायदा सुव्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या पोलिसपाटलांना स्थानिक पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कर्तव्य बजावत असताना पोलिसपाटलाला मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता यापुढे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसपाटलाला मारहाण, शिवीगाळ करणे महागात पडणार असून, असे केल्यास सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे. 

पोलिसपाटीलही झाले लोकसेवक

राज्यातील पोलिसपाटलांच्या संदर्भात गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून, पोलिसपाटील कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संबंधितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. पोलिसपाटील हा सरकारचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर असते. कर्तव्य बजावत असताना पोलिसपाटलास मारहाण झाल्याच्या घटना घडतात. अशावेळी दोषींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. आतार्यंत पोलिसपाटील ‘सरकारी नोकर’ या व्याख्येत बसत नव्हते. त्यामुळे हे कलम लावले जात नव्हते. मात्र, यासाठी कलम ३५३ मध्ये ७ जून २०१८ च्या अधिसूचनेनुसार करण्यात आलेल्या सुधारणांचा आधार घेण्यात आला. त्याचा आधार घेतल्यास पोलिसपाटील लोकसेवक ठरत असल्याने कर्तव्य बजावत असताना त्याच्यावर हल्ला झाल्यास हे संरक्षण देता येऊ शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

संघटनेकडून निर्णयाचे स्वागत

पोलिसपाटील संघटनांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत ३ डिसेंबर २०२० ला मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्‍वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. त्याला अनुसरून हा आदेश काढण्यात आला आहे. या निर्णयाचे तालुका पोलिसपाटील संघटनेचे अध्यक्ष भगवान साबळे, उपाध्यक्ष सुनील वाघ, कार्यकारी अध्यक्ष मारुती पिंगट, प्रसिद्धिप्रमुख नितीन गायकवाड, सुभाष शेलार, नितीन काळे, दत्तात्रय आहेर, वंदना राऊत, शकुंतला चव्हाण, जयश्री परदेशी, शीतल काळे, प्रीती सोनवणे, कैलास रोठे, प्रकाश सोनवणे, बाळनाथ पानसरे, भाऊसाहेब गायकवाड, मोनिका लव्हाळे आदींनी स्वागत केले. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO