“गिते, बागुलांना सन्मानाची पदे देऊनही सोडचिठ्ठी खेदजनक! भाजपवर परिणाम नाही”

नाशिक : भारतीय जनता पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे कोणत्या नेत्याने कुठे जावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. वसंत गिते व सुनील बागूल यांनी पक्ष सोडल्याने भाजपची ताकद कमी झालेली नाही किंवा संघटनात्मकदृष्ट्या काहीही परिणाम होणार नाही. मात्र वसंत गिते व सुनील बागूल यांना भाजपमध्ये सन्मानपूर्वक स्थान असतानाही त्यांचा शिवसेना प्रवेश खेदजनक असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले. 

सन्मानाची पदे देऊनही सोडचिठ्ठी खेदजनक 
गिते व बागूल यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपतर्फे एकमेव प्रतिक्रिया शहराध्यक्ष पालवे यांनी दिली. दोन्ही नेत्यांना भाजपमध्ये सन्मान देण्यात आला आहे. गिते व बागूल दोघांनाही प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. दोन्ही नेते भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य होते. प्रथमेश गिते व भिकूबाई बागूल यांना भाजपने उपमहापौरपद दिले. मनीष बागूल भाजयुमोचे अध्यक्ष आहेत, तर प्रथमेश गिते गेल्या वर्षी भाजयुमोचे उपाध्यक्ष होते. 

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

गिते, बागुलांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपवर परिणाम नाही 

महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत समित्यांची निवड असो किंवा महापालिका निवडणुकीत उमेदवारीवाटप असो या प्रक्रियेत दोन्ही नेत्यांना विचारात घेतले जात होते. संघटना पातळीवरील निवडप्रक्रियेत महत्त्वाचा निर्णय घेताना दोन्ही नेत्यांचा सहभाग असायचा. सर्व सन्मान दिले होते. अधिक अपेक्षा होती, तर दोघांनीही प्रदेश नेतृत्वाकडे म्हणणे मांडले असते, तर त्यातून नक्कीच न्याय मिळाला असता. दोघांनीही प्रदेश नेतृत्वाकडे म्हणणे कधीच मांडले नाही. पक्षात सन्मानपूर्वक स्थान देऊनही दोन्ही नेत्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश खेदजनक असल्याचे मत भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

पक्षात सन्मानजनकस्थान देऊनही गिते व बागूल जात असतील, तर हे खेदजनक आहे. मात्र, दोघांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपवर कुठलाच परिणाम होणार नाही. भाजप हा देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. -गिरीश पालवे, शहरध्यक्ष, भाजप