नाशिक : भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद्भगवद्गीता जयंती महोत्सव यंदा गुजरात राज्यात साजरा होणार असून, २० ते २२ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित या भव्य संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. देशभरातील महानुभाव पंथांचे संत या संमेलनात उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक तथा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी नाशिक येथे डोंगरे वसतीगृह मैदानावर अखिल भारतीय महानुभाव संमेलन यशस्वीपणे आयोजित केले होते. यंदा संमेलन व श्रीमद् भगवद्गीता जयंती महोत्सव गुजरातच्या वडसाड जिल्ह्यातील कपराडा तालुक्यातील वाळविहीर येथे आयोजित केला आहे. संमेलनास गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील व महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींसह गुजरातसह महाराष्ट्रातील खासदार, आमदार व मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनात साधू, संत, महंत, तपस्विनी, वासनिक, उपदेशी उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसीय संमेलनात सुमारे पाच लाख नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. संमेलनाचा मुख्य उद्देश गुजरात राज्यातील भडोच येथील परब्रम्ह परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा वाडा हा महानुभाव पंथियांना दर्शनासाठी खुला व्हावा, अतिदुर्गंम पालघर, बलसाड, डांग, तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात महानुभाव पंथाचे हजारो बंधू-भगिनी असून, त्यांनी खूप मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या धर्मपंथ प्रचार-प्रचारासाठी बळ मिळावे, महानुभाव पंथ आणखी मोठ्या प्रमाणावर वाढावा हा आहे. दरम्यान, संमेलनासाठी देशभरातील महानुभाव पंथाचे साधु, संत, महंत, तपस्विनी वासनिक यांनी परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींच्या कार्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहनही दिनकर पाटील यांनी याप्रसंगी केले. यावेळी आयोजक राजेंद्र जायभावे उपस्थित होते. संमेलनासाठी मुख्य आयोजक दिनकर पाटील, गुजरातचे आमदार जितू चौधरी, माजी आमदार बाळासाहेब सानप, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, दत्ता गायकवाड, प्रकाश ननावरे, राजेंद्र जायभावे प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा :
- Bengaluru schools: बंगळूरमधील १५ हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल
- अप्पी आमची कलेक्टर : शिवानी नाईकची पहिली गाडी, फोटो व्हायरल
- Go-Green Registration : नाशिक परिमंडळात ४१ हजार वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख
The post गुजरातमध्ये होणार अखिल भारतीय महानुभाव संमेलन appeared first on पुढारी.