गुजरात कांदा उत्पादकांना मदत करतय, मग महाराष्ट्र का नाही?

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचीच होळी झाली. धुळवडीचे रंग खेळले जात असताना शेतकऱ्यांचे जीवन बेरंग झाले आहे. त्यामुळे अशा स्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत घोषित करण्याची गरज आहे. गुजरातसारख्या राज्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ३५० कोटी रुपयांची मदत घोषित केली. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी असताना महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत का नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला.

भुजबळ म्हणाले, अवकाळीमुळे काही ठिकाणी द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने बागा उभ्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे हे द्राक्ष उत्पादक आता पाच वर्षे मागे गेले आहेत. कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला यासह अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही नाफेड प्रत्यक्ष मार्केटमध्ये कांदा खरेदी न करता बाहेरच कांदा खरेदी करत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, नाशिक जिल्ह्यात तर शेतकऱ्यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने चक्क गाव विकायला काढले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी शासनाने तातडीने कारवाई करत मदतीची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तत्काळ मदत करण्यात येऊन सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल, अशी माहिती उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

हेही वाचा :

The post गुजरात कांदा उत्पादकांना मदत करतय, मग महाराष्ट्र का नाही? appeared first on पुढारी.