गुडघ्यावर टेकविण्याची भाषा योग्य नव्हे : डॉ. निलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे प्रत्येक महाराष्ट्रीयन आनंदाने नतमस्तक होईल. पण स्वत:च्या मुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्याला गुडघ्यावर टेकायला लावण्याची भाषा योग्य नाही, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महायुतीला मिळणारे यश पाहून विरोधकांनी निकालापूर्वीच ईव्हीएमच्या नावाखाली रडीचा डाव सुरु केला आहे, अशी टीकादेखील त्यांनी केली.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या डाॅ. गोऱ्हे यांनी गुरुवारी (दि.१६) पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात लोकसभेच्या पहिल्या चार टप्यांचा कल लक्षात घेता महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. ईव्हीएमच्या नावाखाली त्यांनी रडीचा डाव खेळण्यास सुरवात केली आहे. मुळातच ईव्हीएमवर अविश्वास दाखविणाऱ्यांकडून अन्य गोष्टींबद्दल विश्वासाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. हा प्रकार म्हणजे पेपरचा नीट काढला नाही, योग्यप्रकारे त्याची छपाई केली नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खरडपट्टी काढली.

विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जातोय

केंद्र व राज्यात महायुतीच्या नेतृत्वात वेगाने विकास होत आहे. त्यामूळे निवडणूकीत विरोधकांकडे मुद्देच ऊरले नाही. त्यामूळेच फेक व्हिडीओ, राज्यघटना बदलणे असे मुद्दे पुढे करत विरोधक हे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहे. ज्या कॉग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबडेकर यांना विरोध केला, त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले त्याच कॉग्रेसकडून हा संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप डाॅ. गोऱ्हे यांनी केला. राज्यात पार पडलेल्या चारही टप्यात महायुतीत समाजिक समीकरण अधिक वाढीस लागले. या माध्यमातून नेते, पदाधिकारी व कायकर्ते एकत्रित येण्यास मदत झाल्याची भावना गोऱ्हे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेनेचे सरचिटणीस भाऊसाहेब चाैधरी, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, अस्मिता देशमाने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पवारांचे वाक्य ओळखीचे

१९९८ पासूनच्या निवडणूका मी जवळून बघत आले आहे. खा. शरद पवार यांच्या मनात जेव्हा लाेकांना जिंकता येत नसल्याची भावना निर्माण होते त्यावेळी विविध वक्तव्ये ते करुन गोंधळ निर्माण करतात, असा निशाणा डॉ. गोऱ्हे यांनी पवारांवर साधला. चार जूननंतर छोटे पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन होतील, हे त्यामधील एक वक्तव्य आहे. ते आपल्याला चांगलेच ओळखीचे असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र केली.

हेही वाचा –