गुड न्यूज! नाशिकमध्ये कोरोना रिकव्हरी रेट वाढण्यास सुरवात; ‘या’ उपाययोजनांचा परिणाम

नाशिक : जानेवारी महिन्यापर्यंत कोरोना आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना फेब्रुवारी व मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्याने वैद्यकीय विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या चार महिन्यांत कोरोना रिकव्हरी रेट सर्वाधिक होता. त्यामागच्या कारणांचा शोध घेऊन त्याअनुषंगाने कारवाई सुरू केल्याने मार्चअखेरपर्यंत शंभर टक्क्यांच्या वर रिकव्हरी रेट पोचविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. 

मार्चअखेरपर्यंत शंभर टक्क्यांच्या वर रिकव्हरी रेट पोचविण्याचा प्रयत्न

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णसंख्येत टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. मार्च महिन्यात स्वॅब टेस्टिंग प्रमाण कमी होते. त्यात वाढ करण्यात आली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, रॅपिड ॲन्टिजेन टेस्टमुळे रुग्णसंख्या वाढली तरी बरे होण्याच्या प्रमाणातदेखील वाढ होत गेली. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोनाविषयक कामांकडे पूर्णतः लक्ष देण्यास सुरवात केली. त्याचा परिणाम, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. ऑक्टोबर महिन्यात १२१ टक्के कोरोना रिकव्हरी रेट होता. नोव्हेंबरमध्ये ११४, डिसेंबरमध्ये ११०, तर जानेवारी महिन्यात १०४ टक्के रिकव्हरी रेट राहिला. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कोरोना रिकव्हरी रेट पुन्हा घसरला. परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, मास्क परिधान न करणाऱ्यांवर कारवाई, दोन दिवसांसाठी अंशत: बंद, मेडिकल दुकानात सर्दी, खोकल्याच्या औषधे विक्रीवर बंधने आदी प्रकारच्या उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

\हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

पाच लाख ७९ हजार स्वॅब टेस्टिंग 
वीस लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये पाच लाख ७९ हजार ९२३ स्वॅब टेस्टिंग करण्यात आले. जवळपास २७ टक्के नागरिकांनी स्वॅब टेस्टिंग केल्याचे अहवालातून समोर आले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात शहरात सर्वाधिक स्वॅब टेस्टिंग झाले. सप्टेंबर महिन्यात एक लाख ३६ हजार ५८० स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट महापालिकेकडे जमा झाले. ऑक्टोबर महिन्यात ६५ हजार ६५०, जानेवारी महिन्यात ६२ हजार ३१४ स्वॅब टेस्टिंग झाले. एकूण स्वॅब टेस्टिंगमध्ये एक लाख ३३ हजार ५९० पॉझिटिव्ह केसेस झाल्या. एकूण मृत्यू दोन हजार १७०, तर एक लाख २३ हजार ३७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३५ टक्के राहिले.  

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना