गुप्त माहितीवरून पोलीसांनी सावरगाव शिवारात रचला सापळा; पोलिसीखाक्या दाखविताच खुलासा

येवला (जि.नाशिक) : ग्रामीण पोलिसांचे पथक वरिष्ठांच्या आदेशाने जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक बर्डीकर यांना पाटोदा येथील घरफोडी प्रकरणात सावरगाव येथील संशयित आरोपी अजय लोखंडे व रामा लोखंडे यांचा हात असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यानंतर...

ग्रामीण पोलिसांची कामगिरी, पोलिसीखाक्या दाखविताच खुलासा

त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सावरगाव शिवारात सापळा रचून संशयित अजय आनंदा लोखंडे व रामा शांताराम लोखंडे यांना दोन किलोमीटर पळत पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना पाटोदा येथील घरफोडीची विचारपूस केली असता, त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसीखाक्या दाखवताच त्यांनी २४ डिसेंबरला पाटोदा येथील मोबाईल दुकान फोडल्याची व कोपरगाव येथे मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. मोबाईल दुकान फोडल्या प्रकरणी तालुका पोलिस ठाणे, तसेच मोटारसायकल चोरीबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
या दोन्ही संशयितांच्या ताब्यातून पाटोदा येथील मोबाईल दुकानातील चोरीस गेलेले लावा कंपनीचे दोन मोबाईल फोन, आयटेल कंपनीचे तीन मोबाईल फोन, असे एकूण पाच मोबाईल फोन, तसेच हेडफोन, मोबाईल बॅटऱ्या, चार्जर, स्क्रीनगार्ड व कोपरगाव ग्रामीण येथील गुन्ह्यात चोरीस गेलेली बजाज कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल (एमएच १७, सीजे ५५६४) व गुन्हा करतेवेळी वापरलेली हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. बर्डीकर, पोलिस नाईक रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इमरान पटेल यांनी गुन्हे उघडकीस आणले.