गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतून फुटून शिंदे गटाने भाजप बरोबर सत्ता कशी स्थापली या पाठिमागच्या एक-एक चुरस कथा अजून सुद्धा बाहेर पडत आहेत. आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे प्रमुख नेते गुलाबराव पाटील बंडखोरी करत गोवाहाटीला कसे पोहचले याची आणखी रंजक गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली.

जळगावा येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, सत्ता स्थापनेच्या बंडखोरीवेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्यासोबत जायला खूप अडचणी आल्या. ते अक्षरश: ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटी आले. तसेच गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना याबद्दल सर्व माहिती आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा नियोजित दौरा नव्हता. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचा महाअधिवेशन पार पडले. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी शिंदे यांनी कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही धाडसाने निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचे निर्णय कोणीही घेतले नव्हते, आम्ही ते भाव कमी केले. आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे. एवढा विश्वास बाळगा, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

गिरीश महाजन खेळाडू माणूस…

बडगुजर समाज छोटा असला तरी तुमची एकजूट महत्वाची आहे. आपण सर्व बडगुजर एकत्र केले तर गुजर समाजाची किती मोठी ताकद होईल, असे शिंदे म्हणाले. आमदार किशोर पाटलांनी आग्रह केला अधिवेशनाला आलंच पाहिजे. आमदार गिरीश महाजन आपला खेळाडू माणूस आहे. परदेशात खेळाडूंना विमानाने पाठवणारा हा पहिला मंत्री, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली.

सीएम म्हणजे कॉमन मॅन…

सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर. पण मी म्हणतो कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस! आपल्या राज्याला केंद्राचा देखील मोठा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने आपल्याला दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्राचा देखील आमच्या सरकारला पाठिंबा आहे. म्हणून त्यांच्याशी संबंध जोपासावे लागतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

३० हजार पाणीपुरवठा योजना मंजूर

मला शेतकऱ्यांविषयी फार प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्यांचा देखील जीवनमान बदलला पाहिजे. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हे सरकार आहे. अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय होत आहे. ३० हजार पाणीपुरवठा योजना मंजूर करणे हे देखील रेकॉर्ड आहे. शहरी भागासह ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, असेही शिंदे म्हणाले.

हेही वाचलंत का?

The post गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.