गॅस दरवाढीने मोडले कंबरडे! सबसिडी बंद झाल्याने गृहिणीचे अर्थकारण कोलमडले 

चांदोरी (जि. नाशिक) : केंद्र सरकारकडून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून सबसिडीचा एक रुपयाही सिलिंडरधारकांच्या खात्यावर जमा होत नसल्याने सबसिडी गेली कुठे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आधीच कोरोनामुळे ग्रामीण जनता आर्थिक संकटाचा सामना करीत असतानाच सव्वापट भाववाढीमुळे जनतेचे पुरते कंबरडे मोडले असून, शासनाचे धोरण नागरिकांसाठी जगण्याचा संघर्ष अधिक वाढविणारे ठरत आहे. 

चुलीतून पुन्हा धूर निघणे सुरू

पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी आणि झाडांची कत्तल थांबविण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना राबविली. गॅस गोरगरिबांना मोफत दिला. जनतेकडून झाडांची कत्तल होऊ नये आणि स्वयंपाकावेळी निघणाऱ्या धुरामुळे ग्रामीण भागातील भगिनींच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला; परंतु गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील चुलीतून पुन्हा धूर निघणे सुरू झाले आहे. याआधी गॅस सिलिंडर आणण्याचे भाडे पकडून ६०० रुपयांत मिळत होते अन् त्याची सबसिडीसुद्धा बँक खात्यात जमा होत होती. परंतु, आता गॅस बुकिंग करूनसुद्धा सबसिडी गायब झाल्याने ती सबसिडी गेली कुठे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात गॅस सिलिंडर बुकिंग करण्याची गरज नाही. ८०० रुपये द्या अन् सिलिंडर भरू घ्या, असे चित्र आहे. ग्रामीण भागात महिलांचे बजेट बिघडले आहे. आता घरोघरी मातीच्या चुली पेटविल्याशिवाय पर्याय उरणार नाही. शासनाने महिलांचा सन्मान म्हणून उज्ज्वला गॅस महिलांना दिला. परंतु, गॅस सिलिंडर घरात शोभेची वस्तू बनणार का काय, शासनाने गॅसच्या किमती कमी करून सबसिडी खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी ही केली जात आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक आठवड्याला वाढत असल्याने मोलमजुरी करुन सिलिंडर भरणे आम्हाला परवडत नाही. त्यामुळे नाईलाजाने चूल वापरावी लागते आहे. 
- शोभा शिंदे, गृहिणी, चांदोरी 

दिवसेंदिवस होणारी भाववाढ, करावा लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यामुळे ताळमेळ लावताना कसरत करावी लागत आहे. शासनाने सिलिंडरच्या किमती आवाक्यात ठेवण्याची गरज आहे. 
- ज्ञानेश्‍वर लुंगसे, व्यावसायिक, चांदोरी 

केंद सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या गॅस दरवाढीचा निषेध आहे. दरवाढ कमी करून गृहिणींना दिलासा द्यावा. अन्यथा, सामान्य नागरिकांचा रोष वाढल्याशिवाय राहणार नाही. 
- संगीता पाटील, सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, नाशिक 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले