गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये अवघ्या आठ पुरुषांनी केली शस्त्रक्रिया

family planning www.pudhari.news

नाशिक : असिफ सय्यद

एकविसाव्या शतकातही खुळचट पुरुषी मानसिकता कायम असून, पुरुषप्रधान संस्कृती म्हणून मिरवणाऱ्या समाजात कुटुंब नियोजनाचा भार स्त्रियांवरच असल्याचे धक्कादायक वास्तव नाशिकसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातील केवळ आठ पुरुषांनी नसबंदी केली असून, पुरुष नसबंदीचे हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या शून्य टक्के आहे. त्या तुलनेत तब्बल १० हजार ९०८ स्त्रियांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.

लोकसभंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागातर्फे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविल जातो. एक किंवा दोन मुलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजन करावे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे दिला जातो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागातर्फे लाभार्थ्यास ९०० ते १३०० रुपये अनुदानही दिले जाते. महिलांसाठी टाक्याची व बिनटाक्याची अशा दोन प्रकारे शस्त्रक्रिया केली जाते, तर पुरुषांसाठी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. आरोग्य विभागाकडून या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही एकाने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्री आणि पुरुष दोघांची समान आहे. मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा भार स्त्रियांच्याच खांद्यावर टाकला जात आहे. वैवाहिक दाम्पत्यामध्ये अपत्यप्राप्तीनंतर कुटुंब नियोजनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जातो. त्यात महिलाच पुढे आहेत. गेल्या पाच वर्षांतील नाशिक शहरातील स्त्री-पुरुष कुटुंब नियोजनाची आकडेवारी पुरोगामित्वाचा आणि स्त्री-पुरुष समानतेचा टेंभा मिरवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.

पुरुष नसबंदी शून्य टक्के
२०१९-२० ते २०२३-२४ या गेल्या पाच वर्षांत जेमतेम ८ पुरुषांनीच नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षांत प्रतिवर्षी ४२४ पुरुषांच्या नसबंदीचे उद्दिष्ट महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला देण्यात आले होते. त्यात २०१९-२०मध्ये ३, २०२०-२१मध्ये शून्य, २०२१-२२ मध्ये १, २०२२-२३ मध्ये २ तर २०२३-२४ मध्ये २ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली. २०१९-२० मध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण अवघा १ टक्का होते, तर २०२०-२१ ते २०२३-२४ या चार वर्षांत हेच प्रमाण शून्य टक्क्यांवर आले.

१०,९०८ स्त्रियांनी केली शस्त्रक्रिया
नसबंदी शस्त्रक्रियेत पुरुषांचे प्रमाण शून्य टक्क्यांवर असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग मात्र लक्षणीय राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल १० हजार ९०८ स्त्रियांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. यात २०१९-२० मध्ये २७३८, २०२०-२१ मध्ये १६६५, २०२१-२२ मध्ये २३१९, २०२२-२३ मध्ये २४७१, तर २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत तब्बल १७१५ स्त्रियांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. स्त्रियांच्या कुटुंब नियोजनाची गेल्या पाच वर्षांतील टक्केवारी सरासरी ४४ टक्के इतकी आहे.

असा आहे गैरसमज!
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांमध्ये बरेच गैरसमज आहेत. नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास पौरुषत्व नष्ट होईल, घरातील महत्त्वाची कामे पुरुषाला पार पाडावी लागतात. यात ओझे उचलणे, धावपळ करणे, अंगावरील कामे करावी लागतात. नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यास ही कामे करता येणार नाहीत, असा गैरसमज पुरुषांमध्ये पसरविला जातो. त्यामुळे नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास पुरुष पुढे येत नाहीत.

पुरुषांवरील शस्त्रक्रिया सोपी
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. यामागे अनेक कारणे आहेत. महिलांपेक्षा पुरुषांवरील शस्त्रक्रिया सोपी आहे. त्यामुळे पुरुष शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज दूर करणे काळाची गरज आहे. महिलांनी शस्त्रक्रिया करावी ही पारंपरिक मानसिकता आहे.

पुरुषांनी नसबंदी केली तर पौरुषत्व नष्ट होते, अशा अफवा पसरविल्या जातात. वास्तविक पाहता स्त्रियांच्या तुलनेत पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया सोपी आहे. – डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा नाशिक.

९९०२ स्त्रियांनी बसविली तांबी
कुटुंब नियोजनात तांबी अर्थात ‘कॉपर टी’चाही वापर स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. गेल्या पाच वर्षांत नाशिक शहरात ९९०२ स्त्रियांनी तांबी बसवून कुटुंब नियोजनात वाटा उचलला. बाळंतपणानंतर अनेकदा काळजी न घेतल्याने वर्षाच्या आत घरात पुन्हा पाळणा हलण्याची शक्यता वाढते. याशिवाय, आधी जन्मलेल्या मुलांचे मातेकडून योग्य पोषणही होत नाही. मातेचे आरोग्यदेखील बिघडते. अशा वेळी तांबी बसविणे आरोग्यदायी ठरते.

The post गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये अवघ्या आठ पुरुषांनी केली शस्त्रक्रिया appeared first on पुढारी.