गोदावरीच्या नशिबी उपेक्षाच! टाळकुटेश्‍वर मंदिरालगत गोदापात्राला गटारगंगेचे स्वरूप

पंचवटी (नाशिक) : माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत काही दिवसांपासून महापालिकेतर्फे शहराच्या सर्वच भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यातंर्गत शनिवारी (ता.२७) गंगाघाटावरील टाळकुटेश्‍वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली खरी, परंतु या मोहिमेतून नाशिकची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केल्याने या भागात नदीला अक्षरशः गटारगंगेचे स्वरूप आले आहे.

गोदावरीचे संवर्धन व्हावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने गोदावरीची दक्षता घेण्याचे आदेश नाशिक महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेतर्फे गोदावरीच्या रक्षणासाठी रामकुंडापासून टाळकुटेश्‍वर पुलापर्यंत काही सुरक्षारक्षकही नेमले होते. मात्र मागील महापालिका आयुक्तांच्या काळात हे कंत्राटी सुरक्षारक्षक कमी करण्यात आले. तेव्हापासून गोदावरीला कोणी वालीच नाही. टाळकुटेश्‍वर परिसरात हजारो टन गाळ व कचरा नदीपात्रात जमा झाली आहे. खरंतर किनाऱ्याबरोबरच नदीपात्राचीही स्वच्छता होणे गरजेचे होते. परंतु तसे न होता केवळ नदीपात्रालगतच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

स्मशानातील कोळसा, राख थेट नदीपात्रात 

गोदावरीच्या दोन्ही बाजूंना म्हणजे पंचवटी व शहराच्या बाजूला अशा दोन स्मशानभूमी आहेत. याठिकाणी अंत्यविधी झाल्यावर ती जागा पाण्याने स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबरच तेथे अर्धवट जळालेली लाकडे, कोळसा ठेप नदीपात्रात वाहून येत आहे. असे कोळसे, हाडे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर आढळून आली. 

कपडे धुण्यासाठी गर्दी 

न्यायालयाच्या आदेशाने गोदापात्रात कपड्यांसह गाड्या धुण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. परंतु टाळकुटेश्‍वर परिसरात असलेल्या नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गर्दी होते. पहाटेपासून दुपारपर्यंत याठिकाणी कपडे धुण्यासाठी गर्दी होते. गाडगे महाराज पुलापर्यंतच्या परिसरात कपडे धुतल्यास दंडात्मक कारवाई होते. परंतु याठिकाणाकडे अद्यापही महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने कपड्यांसह गाड्या धुणारेही मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा