गोदावरीतील पाणवेलींचा प्रश्न गंभीर! नदीकाठच्या नागरिकांसह जलचरांचे आरोग्य धोक्यात

चांदोरी (जि. नाशिक) : गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून आ वासून उभा आहे. उन्हाळा आला की गोदावरीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत असून, गोदावरीत जलपर्णींचा विळखा वाढतच आहे. प्रशासनाकडून दर वर्षी जमेल तेवढा प्रयत्न करीत जलपर्णी हटवून गोदावरी स्वच्छ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. मात्र जलपर्णी हटविण्यासह हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. 

गोदावरी नदीच्या प्रदूषणाकडे शासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दररोज गोदावरी नदीपात्रात निर्माल्यासह कचरा टाकला जात असल्याने तसेच शेवाळाचा थर अशा विविध कारणांमुळे बारमाही वाहणाऱ्या गोदावरीने प्रदूषणाची कमाल मर्यादा कधीच ओलांडली आहे. प्रदूषणाबाबत तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाकडून जुजबी कारवाई करण्यासह कागदी घोडे नाचविण्यात येतात. 

नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याबरोबरच जलचरांचा प्रश्रही ऐरणीवर आला आहे. जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. पिण्यायोग्य पाणी नसल्याने उन्हाळ्यात काही गावांची शुद्ध पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे. त्यातच जलपर्णींच्या समस्येने पुन्हा भर घातली आहे. उन्हाळ्यात प्रवाह थांवला की सांडपाण्याचा थर वाढत जातो. त्यामुळे जलपर्णींची समस्या आणखी बिकट बनते. जलपर्णींमुळे सायखेडा, चांदोरी नदीवरील पूल त्याचबरोबर विविध गावांच्या पाणीयोजनांच्या जॅकवेलला धोका निर्माण होतो. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

प्रदूषणामुळे आजार 

नुकताच गोदावरी नदीत सायखेडा परिसरात सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. हे पाणी शेतीसाठी उपसा केल्यानंतर शेतकरी ॲलर्जी व त्वचेच्या समस्येने हैराण झाले. दारणा, सांगवीपासून गोंडेगाव व तेथून पुढे नांदूरमध्यमेश्वरपर्यंत जलपर्णीच दिसून येत असल्याने मैदानाचे स्वरूप आले होते. जलपर्णींमुळे जलचरांना ऑक्सिजन मिळत नसल्याने जलचर तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. नाशिक महापालिका हद्दीपर्यंत जलपर्णी हटवली जात आहेत. या कामात सरकारी कामाचा फटकाही सहन करावा लागला. ‘सकाळ’च्या माध्यमातून जलपर्णी हटविण्यासाठी आवाज उठविला जात असताना प्रशासन मात्र सुस्त दिसून आले. 

 
जेसीबी व अन्य माध्यमातून जलपर्णी हटविण्याचे काम करण्यासाठी सातत्य राखण्याची गरज आहे. कोल्हापूर, पुण्याच्या धर्तीवर बंधाऱ्याच्या ठिकाणी जाळी टाकणे आदी उपाययोजना करून गोदापात्र सात दिवसांत पाणवेलीमुक्त करावे अन्यथा मी स्वतः गोदावरी नदीपात्रात मंदिरावर बसून आंदोलन करेन. 
-संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते, चांदोरी 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

पाणवेलीमुळे गोदापात्रातील पाणी दूषित झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कावीळ, जुलाब यासह पोटाचे विकार असलेले आजार होत आहेत. 
-डॉ. प्रल्हाद डेर्ले, माउली हॉस्पिटल, चांदोरी