गोदावरीत सोडल्या गटारी; अज्ञातावर नव्हे, तर ठेकेदारावर कारवाईचे निवेदन 

नाशिक : न्यायालयाचा आदेश डावलून गोदावरीत गटारीचे सांडपाणी सोडल्याबद्दल महापालिकेने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्रकार हा अज्ञात व्यक्तीने नव्हे, तर ठेकेदाराने केल्याचा आरोप करीत गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कारवाईची मागणी केली आहे. 

न्यायालयाचा आदेश डावलून गोदावरीत गटारी 
शहरात ३ ऑगस्टला टाळकुटेश्वर पुलाजवळ पंचवटी अमरधामच्या बाजूला वाघाडी नाल्यातून चॅनल गेट सोडून लाखो लिटर गटाराचे सांडपाणी गोदावरीत सोडण्यात आले होते. त्याविषयी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचातर्फे निशिकांत पगारे यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत, महापालिकेने संबंधित ठेकेदारला नोटीस बजावली होती. पण ठेकेदाराने दिलेल्या उत्तरात वाघाडी नाल्याचे पाणी सोडलेले नाही, असे सांगत ठेकेदाराने नकार दिल्यानंतर महापालिका अधिकाऱ्याने अज्ञात व्यक्तीविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाची या तक्रारीलाच हरकत आहे. कुणी अज्ञाताने नव्हे, तर ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनीच संबंधित दूषित पाणी गोदावरीत सोडल्याचा आरोप केला आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

महापालिकेकडून दंड 
याप्रकरणी गोदावरीत सांडपाणी मिसळले जात असल्याचा व्हिडिओ सादर करण्यात आला असून, त्यानुसार, ६ नोव्हेंबरला विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीत महापालिकेने संबंधित ठेकेदाराला पाच हजारांच्या दंडाची रक्कम ठेकेदाराच्या बिलाच्या रकमेतून वजा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता
दंड झाला कारवाईचे काय? 
गोदावरीत गटारीचे सांडपाणी सोडू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराने लाखो लिटर सांडपाणी गोदावरीत सोडले. गोदावरी प्रदूषित केल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर प्रदूषण नियत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

सातत्याने गोदावरीत गटारीचे सांडपाणी सोडले जाते. अनेकदा तक्रार करूनही महापालिकेच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही महापालिका अज्ञाताविरोधात कारवाईचा फार्स करते ही दिशाभूल आहे. त्यामुळे न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. - निशिकांत पगारे (याचिकाकर्ता, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच)