गोदावरी एक्स्प्रेससाठी प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात; मुंबईला जाण्यासाठी हाल होण्याची चाकरमान्यांची भीती 

नाशिक रोड : मनमाड-नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी सोयीची असणारी गोदावरी एक्स्प्रेस बंद होण्याची प्रवाशांना भीती आहे. गोदावरी एक्स्प्रेस बंद करू नये. तसे केल्यास डिसेंबरअखेर प्रवासी संघटना नाशिक रोड रेल्वेस्थानकावर आंदोलन करणार आहे. प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला. 

प्रवाशांकडून आरोप
पंचवटी एक्स्प्रेसनंतर नाशिक जिल्ह्यतील चाकरमान्यांसाठी गोदावरी एक्स्प्रेस सोयीची आहे. अनेक वर्षांपासून चाकरमान्यांची लाइफलाइन बनलेली ही गाडी रेल्वे बोर्ड बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. या चर्चेमुळे रोज ये-जा करणारे प्रवासी अस्वस्थ आहेत. प्रवासी संख्या निम्म्याने घटल्याचे कारण देत मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तर गोदावरी रद्द करण्याचा असा कुठला निर्णय झालेला नसल्याचे मुंबई रेल्वेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

गाड्यांची पळवापळवी 
नाशिकसाठी सुरू झालेली तपोवन वर्षभरापूर्वी नांदेडपर्यंत नेण्यात आली. पुण्याला जाण्यासाठी असलेली मनमाड-नाशिक-पुणे (हुतात्मा एक्स्प्रेस) आता भुसावळपर्यंत वाढविली गेली. मुंबईहून मनमाडपर्यंत धावणारी राज्यराणी एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत वाढविली गेली. त्यापाठोपाठ आता गोदावरी एक्स्प्रेस मनमाडऐवजी धुळ्यापर्यंत वाढविली जाण्याची किंवा थेट बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कारण नेमके गोदावरीच्या वेळेत मनमाड ते मुंबई हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हावडा मुंबई मेलचे वेळापत्रक करण्यात आले आहे. तर मुंबईवरून मनमाडच्या दिशेने लोकमान्य टिळक टर्मिनस-राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेसचे वेळापत्रक करण्यात आले आहे, असा प्रवासी संघटनेचा आरोप आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

...तर आंदोलन 
दरम्यान, नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी हक्काच्या तीन गाड्या आहेत. राज्यराणी सकाळी सहाला, पंचवटी सव्वासातला, तर गोदावरी सव्वानऊला नाशिक रोडला येते. रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी बंद करण्याचे डावपेच खेळले, तर डिसेंबरअखेर नाशिक रोडला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गुरमित रावल व महिला प्रवाशांनी दिला आहे. 

गोदावरी रद्द नये, तिच्या वेळापत्रकात संशोधन सुरू असेल, तर त्याबाबत लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना द्यावी, सत्यता निर्दशनास आणावी. 
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक 

प्रशासनाने गोदावरी एक्स्प्रेस सुरू ठेवली, तर महसुलात वाढ होईल. गोदावरी सुरू ठेवण्यासाठी या महिनाअखेरीस प्रवासी संघटना आंदोलन करणार आहे. - गुरमितसिंग रावल, अध्यक्ष, प्रवासी संघटना, नाशिक