गोदावरी नदीपात्रात दुसऱ्या दिवशीही लोखंड गोळा करण्यासाठी उलटली गर्दी; अनेक जणांचा जीव धोक्यात

पंचवटी (नाशिक) : सध्या गोदावरी नदीपात्रात स्मार्टसिटींतर्गत नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र काँक्रिटीकरण काढताना त्यातून निघणारे लोखंड गोळा करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून तोबा गर्दी उसळत आहे. दगडामधून लोखंड काढताना दोन-तीन जण जखमी झाले आहेत. जेमतेम २२ ते २४ रुपये मिळणाऱ्या या कामात अनेक जण जीव धोक्यात घालून हे लोखंड काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. 

मोठी दुर्घटनाही घडू शकते. 

गोदावरी नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढण्याचे काही दिवसांपासून काम सुरू आहे. तीन-चार पोकलॅन्ड मशिनद्वारे नदीपात्रात खोदकाम केले जात आहे. काँक्रिटीकरणाखाली असलेल्या लोखंडी सळ्या काढण्यासाठी तुफान गर्दी उसळत आहे. दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच असल्याने ठेकेदाराला काम करणे अवघड बनले आहे. कारण या ठिकाणी कष्टकऱ्यांसह गर्दुल्ले व व्यसनीही मोठ्या संख्येने जमा होत आहेत. काम सुरू असताना लोखंडाचा एखादा तुकडा दिसला की तो घेण्यासाठी संबंधित मोठी गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे लोखंड गोळा करताना हे लोक कोणतीही काळजी न घेता मशिनच्या अति जवळ येत असल्याने मोठी दुर्घटनाही घडू शकते. 

ज्येष्ठासह चिमुरडा जखमी 
बुधवारी (ता. ९) सायंकाळी नदीपात्रालगत एका मोठ्या दगडात अडकलेले लोखंड काढण्यासाठी काही तरुण दुसरा दगड त्यावर आपटत लोखंड काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याच वेळी एक मोठा दगड उडून एक वयोवृद्ध व छोटा मुलगा जखमी झाला. विशेष म्हणजे रक्तस्राव होऊनही या दोघांची दखल घ्यायला अन्य लोखंड गोळा करणाऱ्यांना वेळच नव्हता. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

स्टील चोवीस रुपये किलो 
नदीपात्रातून निघणारे लोखंड गोळा करण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे. यात कष्टकऱ्यांसह व्यसनी, गर्दुल्ले मोठ्या संख्येने जमत आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर लोखंड निघत असून, त्याची जागेवरच २४ रुपये किलोने विक्री सुरू आहे. म्हणजे अवघ्या २०-२२ रुपयांसाठी अनेक जण जीव धोक्यात घालत आहेत. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

गोदापात्रातील हे काम स्मार्टसिटींतर्गत सुरू आहे. काम सुरू असताना येथे मोठी गर्दी उसळत असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन संबंधित ठेकेदाराला त्याबाबत समज दिली आहे. - प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी, अधिकारी स्मार्टसिटी