गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासंदर्भात खासदार भारती पवारांची संसदेत मागणी; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल

चांदोरी (जि.नाशिक) : गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आ वासून उभा आहे.उन्हाळा आला की गोदावरीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत असल्यामुळे वाढलेले प्रदूषण व पिण्यास अयोग्य बनणाऱ्या गोदावरी नदीत जलपर्णीचा विळखा वाढतच जातो. प्रशासनाकडून दरवर्षी जमेल तेवढा प्रयत्न करीत जलपर्णी हटवून गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो; मात्र जलपर्णी हटवण्यासह कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ भारती पवार यांनी संसदेत मुद्दा उपस्थित केला.

गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पानवेलींनी घेरलेले

गोदावरी नदी जी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी आहे. तिला दक्षिण गंगा देखील म्हटले जाते. गोदावरी नदीची उत्पत्ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून झाली असून तिला मोठे धार्मिक महत्त्व आहे. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की, वाढत असलेले जल प्रदूषण गोदावरीची समस्या बनलेले आहे. खूप साऱ्या कंपन्यांचे केमिकल युक्त खराब पाणी या नदीपात्रात सोडले जाते. ज्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्या योग्य राहत नाही. आणि त्यामुळे अनेक आजारांची लागण नागरिकांना होत आहे जसे की, त्वचे संबंधी आजार असेल पनिजण्य रोग असेल हे आजार होण्याची भीती देखील असते.  पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पानवेलिनी घेरलेले आहे. खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेत प्रश्न मांडत असताना दिंडोरी लोकसभा मतदार संघातील निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर येथे पक्षी अभयारण्य आहे.

गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना

ज्या ठिकाणी 200 पेक्षा अधिक निरनिराळ्या जातींचे पक्षी येत असतात ज्यामध्ये फ्लेमिंगो, स्पुन बिल्स असेल. त्याच ठिकाणी 25 पेक्षा अधिक माशांची देखील प्रजाती पहावयास मिळते. नांदूरमध्यमेश्वरला रामसर मध्ये घोषित केले आहे. ह्या अनमोल ठेव्यास सुरक्षित ठेवण्याची देखील जबाबदारी आहे परंतु या देखील क्षेत्रात जल प्रदूषणाचा धोका वाढत आहे. ह्यामुळे खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून विनंती केली की, केंद्र आणि राज्य सरकार मार्फत स्वच्छता अभियान राबवून गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली.

गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात सकारात्मक निर्णय
दिनांक (ता.१२) मार्च रोजी दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची खासदार डॉ भारती पवार यांनी दखल घेऊन संसदेमध्ये चर्चा केली.
लवकरच गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात सकारात्मक निर्णय होईल.अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.