नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी आता सर्वधर्मिय धर्मगुरूंना साकडे घातले जाणार आहे. सर्वच धर्मांमध्ये नदी शुध्दतेचे महत्त्व विशद केले असल्याने धर्मगुरूंमार्फत जनजागृतीची मोहिम हाती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीत तयार होणाऱ्या पानवेली हटविण्यासाठी रासायनिक औषधांचा मारा केला जाणार असून तत्पूर्वी ‘नीरी’चे मत घेतले जाणार आहे.(Godavari River Nashik)
गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्थापन करण्यात आलेल्या विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक आज पार पडली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, प्रदुषण मंडळाचे अमर दुर्गुळे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, पोलिस निरीक्षक बगाडे, एमआयडीसीचे जयवंत बोरसे, गोदावरी गटारीकरण मंचचे निशिकांत पगारे आदी यावेळी उपस्थित होते. (Godavari River Nashik)
प्रत्येक धर्मात नदीचे महत्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे गोदावरी प्रदुषण मुक्त करण्यासाठी धर्मगुरुंना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेतल्यास प्रदूषणमुक्ती लोकांच्या मनांपर्यंत पोहोचेल, अशी संकल्पना गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे निशिकांत पगारे यांनी मांडली. धर्मगुरु किंवा प्रत्येक धर्माच्या प्रमुखांनी पुढाकार घेवून जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. गोदावरी नदी पात्रात दरवर्षी ठराविक कालावधी नंतर पानवेली साचतात. पानवेली हटविण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. दरवर्षी पानवेली हटविण्यासाठी विशेष आर्थिक तरतुद केली जाते. परंतू पानवेलींवर ठोस उपाययोजना होत नाही. महापालिकेने सन २०१२ मध्ये पानवेली हटविण्यासाठी दोन रोबोटिक यंत्रांची खरेदी देखील केली परंतू त्या यंत्राचा वापर झाला नाही. त्यामुळे आता केमिकल द्वारे पानवेली व बीज नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्लाय फॉस्फेट केमिकलचा वापर करून पानवेली हटविली जाणार आहे. परंतू केमिकल वापरल्यामुळे नदीमधील जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होवू शकतो का यावर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी या केंद्र सरकारच्या संस्थेकडून मत मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. गोदावरी नदीतील कॉन्क्रिटीकरण हटविण्याच्या सुचना आहेत. परंतू तांत्रिक कारणामुळे क्रॉन्क्रिट हटविण्यास विलंब होत असल्याने तातडीने कॉन्क्रिट हटविण्याच्या सुचना देण्यात आल्या. सांडपाणी शुध्द केल्यानंतर नदी पात्रात सोडले जाते. त्यानंतरही नदी पात्रात फेस दिसून येतो त्यामुळे फेस निर्माण होण्याची कारणांचा शोध घेण्यासाठी उपाययोजना निरीकडून मागितल्या जाणार आहे. (Godavari River Nashik)
गोदेकाठी सिमेंटच्या भिंतीला आक्षेप
गंगापूर भागात चिखली नाल्याला लागून सिमेंट कॉन्क्रिटची भिंत बांधली जात आहे. वास्तविक उच्च न्यायालयाने नदी जिवंत ठेवण्यासाठी गॅबियन वॉल बांधण्याच्या सुचना दिल्या आहेत. असे असतानाही महापालिकेने सिमेंट कॉन्क्रीट भिंत बांधण्यास परवानगी दिल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला. सिमेंट भिंत हटविण्यासाठी महापालिका आयुक्तांना सुचना देण्यात आल्याचे विभागी आयुक्तांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :
- Article 370 Review : यामी गौतम- प्रियामणीवरील हटेना नजर, अॅक्सन सीनचा तडका
- ‘युवा पुढारी’ सन्मान सोहळा उद्या रंगणार
- Avatar : The Last Airbender – ही संधी सोडू नका, अवतार : द लास्ट एयरबेंडर पाहिला का?
The post गोदा प्रदूषणमुक्तीसाठी आता धर्मगुरूंना साकडे appeared first on पुढारी.