गोदेतील काँक्रिटीकरण काढण्याला पुन्हा गती; प्राचीन कुंडे पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान

पंचवटी (नाशिक) : गोदापात्रातील काँक्रिटीकरणाचा बेड काढण्याचे काम पाच महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाले आहे. दुतोंड्या मारुतीखालील काँक्रिटीकरण काढले जात आहे. 

२००३ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदापात्रातील प्राचीन कुंडे फोडून नदीपात्रात सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात आले होते. पात्राच्या दुतर्फा असलेल्या दगडी पायऱ्या काढून सिमेंटच्या पायऱ्या करण्यात आल्या होत्या. अहिल्यादेवी होळकर पुलापासून ते थेट टाळकुटेश्‍वर मंदिरापर्यंतच्या नदीपात्राचे काँक्रिटीकरण करण्यात आले हेते. परंतु त्यामुळे नदीपात्राची खोली कमी होऊन नैसर्गिक जलस्त्रोतही बंद झाल्याचा आरोप करत गोदाप्रेमींनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत त्याविरोधात दाद मागितली होती. याचिकाकर्त्यांनी या काँक्रिटीकरणामुळे नदीपात्रात फुगवटा तयार होऊन ही बाब महापुराला कारणीभूत होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. 

प्राचीन कुंडे पुनरुज्जीवित होणार का? 

काँक्रिटीकरणापूर्वी रामकुंडापासून रोकडोबा मंदिरापर्यंत प्रत्येक कुंडाची ओळख होती. ही कुंडे पुनरुज्जीवित झाल्यास नदीपात्रातील जिवंत पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत होण्याची मागणी आहे. मात्र, सतरा-अठरा वर्षांपूर्वी काँक्रिट ओतून बंद केलेली कुंड पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान आहे. 

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

इतिहास काय सांगतो

पूर्वीच्या सिंतोडे महादेव कुंडाचे १७२० मध्ये बाजीराव पेशव्यांनी नव्याने बांधणी केल्याचा इतिहास सापडतो. याठिकाणी पूर्वी वरुणा (वाघाडी) सरस्वती या नैसर्गिक नाल्यांसह मेधा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा गोदावरीशी संगम गोदापात्रात होत असे. पूर्वीच्या खंडेराव महाराज कुंडाच्या वरील बाजूस हे कुंड होते. पाच नद्यांच्या संगमाचे महत्त्व जाणूनच बाजीराव पेशव्यांनी या कुंडाची नव्याने बांधणी केल्याचे सांगितले जाते. प्रभू रामचंद्रांनी वडिलांचे श्राद्ध ज्या ठिकाणी घातल्याची आख्यायिका आहे ते रामगयाकुंड नारोशंकर मंदिराच्या समोर आहे.  

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न