‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ म्हणत मालेगाव महापालिकेचा कचरा ठेका अखेर रद्द

‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ म्हणत मालेगाव महापालिकेचा कचरा ठेका अखेर रद्द

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिकेच्या म्हाळदे शिवारातील कचरा डेपोमधील चार लाख क्युबिक मीटर घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आलेला वादग्रस्त १५ कोटी २५ लाख ७५ हजार रुपयांचा ठेका अखेर गुरुवारी झालेल्या विशेष महासभेत सर्वानुमते रद्द झाल्याची घोषणा महापौर ताहेरा शेख यांनी केली.

तत्पुर्वी ऑनलाइन महासभेत सत्तारुढ गटातील शिवसेना व प्रामुख्याने स्थायी समिती व आयुक्तांना सदस्यांनी टिकेच्या फैरींनी घेरले. समितीने हा वादग्रस्त ठेका का मंजूर केला? यामुळे सर्वच नगरसेवकांची बदनामी झाली अशी टिका करतानाच ऑनलाइन महासभेत ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ या गाण्याचे सूर गुंजले. बहुसंख्य सदस्यांनी हे गाणे गात वादग्रस्त ठेक्याची पोलखोल केली. ‘सकाळ’ ने २३ मार्च व २७ मार्च असे सलग दोन वेळा या संदर्भात विशेष वृत्त प्रसिद्ध करुन वादग्रस्त ठेक्यातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.१) दुपारी माजी महापौर रशीद शेख, माजी उपमहापौर सखाराम घोडके आदींसह ३२ सदस्यांच्या मागण्यांनुसार वादग्रस्त ठेक्यासंदर्भातील निविदा व ठरावाचा पुर्नविचार करु, योग्य तो निर्णय घेण्यासाठी विशेष महासभा बोलाविण्यात आली होती. उपमहापौर नीलेश आहेर, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, नगरसचिव श्‍याम बुरकुल सभास्थानी होते. सभेला सुरवात होताच विषय वाचन करण्यापुर्वीच भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनी मसगा कोविड सेंटर व खासगी हॉस्पीटल कोरोना बाधितांनी फुल झाले असून बालगंधर्व रंगमंदिरसह अन्य एखादी जागा ताब्यात घेऊन पश्‍चिम भागात दोन नवीन कोविड सेंटर सुरु करावेत, असे सुचविले. शेख यांनी नगरसचिवांना गणपुर्ती झाली की नाही याची विचारणा केली. सभेत ४६ सदस्य ऑनलाइन सहभागी झाले होते. बुरकुल यांनी विषयाचे वाचन करताच श्री.गायकवाड, महागटबंधन आघाडीचे मुश्‍तकीम डिग्निटी, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी आक्रमक भूमिका घेत स्थायी समितीने ठराव का केला?, समिती आमिषाला बळी पडली का? समितीनेच निविदा का रद्द केली नाही? अनामत न देण्याचा आदेश असताना, मोबिलायझेशन ॲडव्हान्स देण्याचा ठराव केलाच कसा? समितीच्या सभापतींनी सामोरे यावे, समितीच्या बैठकीत आम्ही विरोधात होतो, सभापतींनी फसवणूक करुन हा ठराव केला आहे. अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली.  आहेर यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जयप्रकाश बच्छाव, अमानतुल्ला पीर मोहंमद आदी सदस्यांनीही चर्चेत भाग घेतला. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

अन् सदस्य गायला लागले..

महासभेत चर्चा सुरु असतानाच अनेक सदस्यांनी ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ हे गाणे सुरु केले. अस्लम अन्सारी यांनी ‘सब मिठाई बट गई’ अशी कोटी केली. डिग्निटी यांनी स्थायीची निविदा रद्द करा. या ठरावाचे सुत्रधार आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी सूचना मांडली.  घोडके यांनी उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा. त्यानंतर आठ दिवसात निर्णय घ्यावा, अशी सूचना मांडली. सदस्य आरोप-प्रत्यारोप करु लागले. मात्र हा ठराव रद्द करावा, असे सर्वच सदस्यांचे मत होते. सदस्यांची भूमिका जाणून घेत अखेर वाद विकोपाला जावू नये, यासाठी महापौर शेख यांनीच वादग्रस्त कचरा ठेक्याचा ठराव सर्वानुमते रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली.