नाशिक: पुढारी वृत्तसेवा
शहरात रविवारी रात्री १० वाजता रवी शंकर मार्गावर भर नागरी वसाहतीत महादेव पार्क सोसायटी येथे झालेल्या गोळीबारात एक इसम ठार झाला, तर एकावर प्राणघातक हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अमोल पोपटराव काठे असे मृताचे नाव असून जखमीचे नाव कुंदन घडे असे आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट होत असून मृत काठे हा माजी सैनिक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रात्री उशीरापर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. नाशिकमध्ये रविवारी (दि.१०) सकाळी पंचवटी मध्ये आणि रात्री रवीशंकर मार्गावर खुनाच्या पाठोपाठ दोन घटना घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली असून खूनाच्या सत्रामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महादेव पार्क येथे अमोल काठे व कुंदन घडे यांच्यात वाद सुरू असताना दोघांनी एकमेकांवर अचानक हल्ला केला. घडे याने काठेवर गोळीबार केला. डोक्यात गोळी लागल्याने काठे जागीच ठार झाला. या बाचाबाचीमध्ये कुंदन देखील अमोलने चॉपर, कोयत्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळल्यानंतर उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी घडे बोलण्याच्या स्थितीत नसून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काठे आणि घडे या दोघांमध्ये रविवारी (दि.१०) रात्री ८ वाजेपासून टोकाचे वाद सुरु होते. काठे दुचाकीवरुन या ठिकाणी आला होता. पोलिसांच्या प्राथिमक तपासामध्ये दुचाकीची नंबर प्लेट बनावट असल्याचेही आढळून आले आहे.
अनैतिक संबंधांची भावाकडून माहिती
मयत काठे याच्या पत्नीसोबत कुंदनचे प्रेमसंबध होते. कुंदनमुळे पत्नी फारकत देणार याचा राग काठेच्या मनात होता. त्याचा जाब विचारण्यासाठी काठे तेथे आला होता. दोघांमध्ये प्रथम शाब्दीक वाद झाले त्यानंतर वादाचे पर्यवसन हाणामारी झाले. त्यानंतर काठेने शस्त्राने वार केला. तर कुंदनने गोळीबार केल्याची माहिती कुंदनच्या भावाने दिली आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
The post गोळी झाडणारा संशयितही बाचाबाचीत जखमी; रवीशंकर मार्गावरील घटना appeared first on पुढारी.