ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना लग्नतिथीत चमकोगिरीची संधी! 

मालेगाव (जि.नाशिक) : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ९९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मालेगाव तालुक्यात होणार आहेत. मंगळवार (ता.८)पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने मातब्बरांचा हिरमोड झाला असला तरी गावकारभारी होण्यासाठी तरुणतुर्कांबरोबरच प्रस्थापितही सरसावले आहेत.

तरुणतुर्कांबरोबरच प्रस्थापितही सरसावले

या हंगामातील १७ व १९ डिसेंबर ही सर्वाधिक मोठी लग्नतिथी आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य मंगल कार्यालय या तिथींना आरक्षित आहेत. या दोन लग्नतिथी इच्छुक उमेदवारांना संपर्क, भाऊबंदकी, वाड्याच्या राजकारणात व मतदाराच्या आप्तेष्टांकडे काम करण्याची व चमकोगिरीची मोठी संधी देणाऱ्या ठरत आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) विविध ठिकाणी मांडव व हळद समारंभ झाला. इच्छुक उमेदवार या दोन्ही कार्यक्रमांना कडक कपडे परिधान करून ओवाळणी टाकताना, नाचणाऱ्यांना प्रोत्साहन देताना व लग्नघरी मोठी कामे करताना आढळले. यामुळे इच्छुक उमेदवारांनी लक्ष वेधून घेतानाच लग्नांच्या माध्यमातून संपर्काची नामी संधी साधली आहे. उमेदवार धावपळ करत असले तरी दाट लग्नतिथीमुळे प्रत्येकाकडे हजेरी लावताना अनेकांची दमछाक झाली. आरक्षणनिहाय संभाव्य सरपंचपद डोळ्यासमोर ठेवून रंगणाऱ्या लढती थिट्या पडणार आहेत. अनेक मातब्बरांनी आपल्या श्रीमतींना रिंगणात उतरविण्याचा बेत आखला आहे. त्या दृष्टीने अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

कोरोना काळात मोठा फटका
विशेष म्हणजे उमेदवारांना प्रचारासाठी तब्बल महिनाभराचा अवधी आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामुळे महिनाभर कार्यकर्ते व मतदारराजाची चंगळ असेल. उमेदवारांप्रमाणेच कार्यकर्त्यांनीही त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे. राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्गावरील हॉटेल व ढाबेचालकांना कोरोना काळात मोठा फटका बसला. ग्रामपंचायत निवडणुकीत ही तूट काही प्रमाणात भरून निघेल, या आशेने संबंधितांनी तयारी सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण व ग्रामीण भागाचे अर्थकारण ढवळून निघणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा मोठा निधी व गावातील मानाचे पद तरुणांसह अनेकांना खुणावत आहे. 

 हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

तरुणांचा वरचष्मा निश्‍चित 
ग्रामपंचायत निवडणुकीला पक्षीय रंग नसला तरी प्रमुख गावांमधील लढतीत पक्षीय राजकारण हमखास शिरकाव करणार. त्यामुळे गावपातळीवरील मातब्बर नेत्यांनी गावातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवार निवडीत या वेळी तरुणांचा वरचष्मा असेल हे निश्‍चित. निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामस्तरीय नेत्यांना पक्षपातळीवर गावातील आपले वर्चस्व दाखविण्याची ही नामी संधी असते. त्या दृष्टीने नेते स्वत: आर्थिक झळ सोसून ग्रामपंचायतीत पॅनल विजयी व्हावे, सरपंच आपलाच असावा, या दृष्टीने नियोजन करीत आहेत.