ग्रामपंचायतीच्या मतदारयाद्या होणार शुद्ध; निवडणूक आयोगाचे आदेश 

येवला (नाशिक) : विधानसभा निवडणुकीची मतदारयादी ग्राह्य धरली पण ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये हद्दीबाहेरील मतदारांची नावे आल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत तक्रारी झाल्याने ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदारांची नावे तत्काळ हटविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या शुद्ध होणार आहेत. 

आता याद्या सुधारित होणार

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसह राज्यभरातील १४ हजार २३५ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षीक निवडणुका पुढील वर्षीच्या सुरवातीला होणार आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदारयाद्यांत, ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील अनेक मतदारांची नावे आल्याची बाब उघडकीस आली होती. सदोष मतदारयाद्यांचा फटका अनेक ग्रामपंचायतींना बसल्याने मतदारयाद्या दुरुस्तीबद्दल हरकतींसह जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. यावर निवडणूक आयोगाने आदेश दिल्याने आता याद्या सुधारित होणार आहेत. 
सध्या हरकती सुरू असून, अशा तक्रारी आल्याने सर्वच भागांतून विचारणा होत असल्याने आयोगाने नवे आदेश काढले आहेत.

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ

आता तहसीलदारांनी अशा मतदारयाद्यांबाबत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) क्षत्रिय तपासणी करून अहवाल घ्यावा व स्थानिक स्वराज्य संस्थेचे बाहेरील मतदारांच्या नावाची खातरजमा झाल्यानंतर अंतिम मतदारयादी बनवावी. नजरचुकीने किंवा इतर कारणांमुळे अशी मतदारांची नावे वगळली गेली असल्यास यानंतर पुरवणी यादीत त्याचा समावेश करावा, अशा सूचना केल्या आहेत. प्रारूप मतदारयादीवर प्राप्त झालेल्या हरकतींचा निपटारा करून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, सोमवारी (ता. १४) अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

 

मतदारयाद्यांत प्रत्येक वेळी होणाऱ्या चुकांमुळे अनेकदा गोंधळ उडतो. आताही तक्रारी आल्याने सुधारणा होत आहे. पण जेथे तक्रारी नाहीत पण याद्यांमध्ये इतरत्रची नावे आलेली आहेत. त्याची सुधारणा व्हायला हवी. प्रशासनाने आता अंतिम याद्या पूर्णतः शुद्ध कराव्यात. 
-नवनाथ लभडे, माजी सरपंच, निमगाव मढ