ग्रामपंचायतीत दडलाय आगामी निवडणुकांचा जुगाड! नेत्यांची अस्तित्वाची लढत 

येवला (जि.नाशिक) : ज्याला गावात किंमत नाही त्याला तालुक्याच्या राजकारणात काय स्थान, असे म्हटले जाते. त्यातच गावात वजन वाढले की प्रत्येक जण तालुक्याच्या राजकारणात डोकावताना पहिली गावातील आपली नाळ घट्ट करतो. आगामी काही महिन्यांत तालुक्यात बाजार समिती, जिल्हा बँक, मर्चंट बँक, खरेदी-विक्री संघ, तसेच पालिका व पुढील वर्षी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या प्रमुख संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी तालुकास्तरावरील दुसऱ्या फळीतील नेते गावच्या राजकारणात उतरले आहेत. अनेकांसाठी हा भविष्याच्या राजकारणाचा जुगाड असून, त्यादृष्टीने अस्तित्वाची लढाई असल्याने ताकदीने दुसरी फळी कामाला लागली आहे. 

भविष्याच्या राजकारणाचा जुगाड
तालुकास्तरीय बाजार समिती, अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रवास व्हाया ग्रामपंचायत असल्याने आणि तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, मुखेड, पाटोदा, राजापूर, धुळगाव, विखरणी, सायगाव आदी सर्वांत प्रमुख ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने हाय होल्टेज ड्रामा ग्रामीण भागात दिसत आहे. तोडीसतोड उमेदवार एकमेकांच्या आमनेसामने उभे असल्याने प्रचारालाही वेग आला असून, नातेगोते व भाऊबंदकीच्या लढाईने राजकीय उष्मा तप्त झाला आहे. तालुक्याचे नेते तालुकास्तरावर पदे देताना पद-प्रतिष्ठा पाहतात. त्यामुळेच दुसऱ्या फळीतील नेत्यांनी रात्रीचा दिवस केला आहे. 
अंदरसूल ग्रामपंचायतीचे राजकारण खालच्या व वरच्या गटाभोवतीच फिरते. त्यातच भुजबळांसाठी या वेळी सत्ताधारी गटाचे नेते सुभाष सोनवणे व युवा नेते मकरंद सोनवणे यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे एकत्रित आल्याने येथील राजकारण बदलले आहे. विरोधकांसमोर यामुळे कडवे आव्हान असले तरी अपक्षांनी देखील दोन्ही पॅनलसमोर आव्हान उभे केले आहे. पॅनलच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असून, सोनवणे परिवारासाठी येथील लढाई महत्त्वपूर्ण ठरली आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

शहरालगतच्या या गावात परिवर्तन घडणार का?
नगरसूलच्या राजकारणात नेहमीच बाजार समितीचे संचालक प्रमोद पाटील यांचे वर्चस्व राहिले असून, गेली पाच वर्षे त्यांचीच सत्ता होती. या वेळी युवा नेते सुनील पैठणकरही त्यांच्यासोबत आले आहे. माजी सभापती सुभाष निकम व निकेत पाटील यांचा पॅनल या वेळी त्यांच्यासमोर उभा आहे. पाटोद्यात यापूर्वी एकत्र सत्तेत असलेले शिवसेनेचे तालुकाप्रमुख रतन बोरणारे व बाजार समितीचे संचालक अशोक मेंगाने आमनेसामने उभे ठाकले आहेत. या दोघांच्या लढाईत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता वाढली आहे. अंगणगाव येथे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी पॅनल रिंगणात उतरवला असून, माजी सरपंच विठ्ठल आठशेरे यांचा पॅनल त्यांच्यासमोर आहे. येथील राजकारणात मोठा बदल झाला असल्याने शहरालगतच्या या गावात परिवर्तन घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजापूर येथे खरेदी-विक्री संघाचे संचालक दिनेश आव्हाड, माजी सरपंच परसराम दराडे, सत्ताधारी गटाचे माजी सभापती पोपट आव्हाड व माजी सरपंच प्रमोद बोडके यांच्यात दर वर्षीप्रमाणे टस्सर आहे.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

चुरशीची लढाई रंगली

दोन्ही पॅनलचे उमेदवार पाहता येथे चुरशीची लढाई रंगली आहे. 
विखरणीत भुजबळ समर्थक व पंचायत समितीचे गटनेते मोहन शेलार यांच्यासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी सभापती विठ्ठलराव शेलार यांचा पॅनल आहे. एक शेलार यांनी सत्ता राखण्यासाठी, तर दुसऱ्या शेलरांनी सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. मुखेड येथील निवडणूक नेहमीच गटानुसार रंगते. यंदाही असेच चित्र असून, राष्ट्रवादीचे बाजार समिती संचालक बाळासाहेब गुंड व जिल्हा परिषद सदस्या कमल आहेर, छगन आहेर यांच्यासाठी निवडणूक महत्त्वपूर्ण ठरली आहे. भाटगाव येथे राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांच्यासह तिघांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित जागेवर सत्तेसाठीचा संघर्ष सुरूच आहे. 
तालुक्याचे प्रमुख नेते असलेल्या माजी सभापती संभाजी पवार यांच्या सावरगावात मात्र त्यांची चलती दिसून आली असून, त्यांच्या शब्दावर संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. 

नवोदित सहकाऱ्यांकडून आव्हान
खामगाव येथेही ॲड. सुदामराव कदम व युवा नेते कुणाल कदम यांच्या प्रयत्नाने पाच जागा बिनविरोध झाल्या असून, त्यांची लेक व सून बिनविरोध निवडल्या आहेत. पिंपरी येथे राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भगवान ठोंबरे व शिवसेनेचे तालुका प्रसिद्धीप्रमुख श्याम गुंड, तसेच स्थानिक नेते एकत्र आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. पिंपळखुंटे-पन्हाळसाठे ग्रामपंचायतीचा सत्तासंघर्ष टोकाचा असतो. मात्र, या वेळी पिंपळखुंटे गाव एकत्र येऊन पालवे, घुगे, मुंढे यांचे एकमत होऊन युवा नेते माजी सरपंच धनराज पालवेंसह सहाही जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता पन्हाळसाठे येथील तिन्ही जागांसाठी जोरदार रस्सीखेच आहे. तालुक्याला अनेक सभापती देणाऱ्या सायगाव येथे अनेक वर्षे सत्तेत असलेले ज्येष्ठ नेते गणपत खैरनार यांच्यासमोर खरेदी-विक्री संघाचे संचालक भागूनाथ उशीर व इतर नवोदित सहकाऱ्यांनी या वेळी आव्हान उभे केले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती आर. डी. खैरनार व ॲड. भालेराव या वेळी निवडणुकीतून चार हात लांब आहेत.

सहा जागांसाठी चुरस

पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी अंगुलगाव येथे स्थानिक नेत्यांच्या सोबतीने महाविकास आघाडीचा पॅनल बनविला असून, त्यांच्यासमोर स्थानिक नेत्यांचा पॅनल आहे. तर जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र काले यांची बोकटे येथे गेल्या तीन टर्मपासून सत्ता असून, या वेळी परिवर्तनासाठी सीताराम दाभाडे व भैरवनाथ दाभाडे आदींनी जोर लावला आहे. त्यामुळे काले-दाभाडे विरुद्ध दाभाडे, अशी लढत रंगली आहे. उंदीरवाडीच्या नऊपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी सहा जागांसाठी चुरस आहे. राष्ट्रवादीचे नेते सचिन कळमकर यांची प्रतिष्ठा येथे लागली आहे. धुळगाव येथे कैलाश खोडके व सहकाऱ्यांची सत्ता असून, परिवर्तनासाठी खरेदी-विक्री संघाचे संचालक डी. एस. आहेर, राजेंद्र गायकवाड यांनी फिल्डिंग लावली आहे. 

महाविकास आघाडी बॅनरवर 
ग्रामीण भागात राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्राबल्य असून, अनेक प्रमुख पदाधिकारी या दोन पक्षांचे आहेत. त्यातच या दोन्ही पक्षांतच अनेक ठिकाणी लढती रंगल्या असल्याने काही ठिकाणी दोन्ही पॅनलनेही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळ यांचे फोटो वापरलेले दिसतात. अनेक ठिकाणी मात्र दोन्ही पक्षांचे पॅनल असूनही कुणाचाही फोटो जाहिराती वापरलेला दिसत नाही.