ग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार

निवडणूक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, प्रारूप मतदार याद्या गुरुवारी (दि. 13) प्रसिद्ध झाल्या.

दिवाळीनंतर या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार आहे. यात डिसेंबर 2022 अखेर मुदत संपलेल्या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाणे, भऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर व सटवाईवाडी या गावांचा समावेश आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून, मतदारांना याद्या या संबंधित गावातील तलाठ्यांकडे पाहावयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या यादीवर कोणाची हरकत किंवा सूचना असेल, तर दि. 18 ऑक्टोबरपर्यंत देवळा तहसील कार्यालयात दाखल करू शकतात. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि. 21 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली. इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, प्रभागातील मतदारांच्या गाठीभेठी घेण्यावर भर दिला आहे. दिवाळीनंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांनी पॅनल निर्मितीसाठी उमेदवांराची चाचपणी सुरू केली आहे. गुप्त बैठका घेऊन रणनीती आखली जात आहे. त्यामुळे निवडणुकीचा ज्वर वाढत आहे.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार appeared first on पुढारी.