ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सदस्यांना आरक्षणाचे वेध; सत्तेची गणिते जुळविण्यास सुरवात

मालेगाव (जि.नाशिक) : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांचे आभार कार्यक्रम सर्वत्र होत आहेत. त्याचबरोबर सत्तेची गणिते जुळविण्यास सुरवात झाली आहे. शेकडो विजयी उमेदवारांना आरक्षणाची प्रतीक्षा आहे. आठवडाभरात तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर होईल. यानंतर खऱ्या राजकारणाला सुरवात होणार आहे. 

सत्तेची गणिते जुळविण्यास सुरवात; आठवडाभरात आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्यात राजकारण तापले होते. मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत झाली. कोरोनामुळे निवडणुका लांबल्याने सहा महिन्यांपासून या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. नवनिर्वाचित सदस्यांना आरक्षण व सरपंचपदाचे वेध लागले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींत गावपातळीवर पॅनल तयार करण्यात आले होते. काही ठिकाणी उमेदवारांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. मतमोजणीनंतर सत्तेसाठी लागणारा जादुई आकडा गाठण्यासाठी गावपातळीवरील प्रमुख नेत्यांचे फिल्डिंग सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे सावध पवित्रा घेतला जात आहे. आरक्षण सोडतीनंतर सदस्यांची पळवापळवी सुरू होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांनी इतर सदस्यांशी नियमित संपर्क ठेवला आहे. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

सरपंचपदाकडे राजकीय पक्षांचे लक्ष 
ग्रामपंचायत निवडणुकीत विविध ग्रामपंचायतींवर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने दावा केला आहे. तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती कोणत्या पक्षाकडे सरपंच निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. प्रमुख राजकीय नेत्यांनी गावपातळीवरील निवडणुकीत प्रत्यक्ष भाग घेतला नाही. मात्र सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी प्रमुख नेते लक्ष घालणार आहेत. तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यात अनुसूचित जातीसाठी आठ, अनुसूचित जमातीसाठी १९, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३४, तर सर्वसाधारण सरपंचपदासाठी ६४ ग्रामपंचायती असतील.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क