ग्रामपंचायत : नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा बिगुल?

ग्रामपंचायत प्रभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीपूर्वी राज्यातील 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात यासर्व ठिकाणी निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत.

राज्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणार्‍या व नव्याने अस्तित्वात आलेल्या 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 196 ग्रामपंचायती आहेत. दिवाळीपूर्वी या सर्व ठिकाणी मतदार याद्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये मतदार याद्यांवर हरकती व सूचना मागविताना 21 ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली होती. यापुढील टप्प्यात निवडणूक कार्यक्रमाकडे आता सार्‍यांच्याच नजरा लागल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जाऊ शकतात, तर डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात या सगळ्या ग्रामपंचायतींना नव्याने कारभारी मिळण्याची शक्यता आहे. यंदा जनतेमधून थेट सरपंचाची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांना धुमारे फुटले आहे. निवडणुकांची घोषणा झालेली नसली, तरी इच्छुकांनी मात्र, त्यांच्या स्तरावर तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत : नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा बिगुल? appeared first on पुढारी.