Site icon

ग्रामपंचायत : पहिल्याच बैठकीत दारू दुकानाच्या स्थलांतराचा ठराव मंजूर

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

जानोरी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी पहिल्याच मासिक सभेत पेठ गल्लीतील भरवस्तीत सुरू असलेल्या दारू दुकानाच्या स्थलांतरित करण्याचा ठराव संमत करून आदर्श कामकाजाकडे एक पाऊल टाकले आहे. या ठरावाचे कौतुक केले जात असून, तो ठराव वास्तवात उतरविण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा, अशी मागणी होत आहे.

भरवस्तीतील दुकानामुळे लहान मुलेदेखील व्यसनाच्या आहारी गेले आहेत. दारूसोबत गांजा अशी दुहेरी नशा करीत शाळकरी मुले वाया जात आहेत, याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यासंबंधीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. त्यावर पहिल्याच मासिक सभेत लोकहिताचे निर्णय घेऊन एक आदर्श कामकाजाला सुरुवात करताना सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रामविकास अधिकारी के. के. पवार, ग्रा. पं. सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, सुरेश सहाळे, युवराज चारोस्कर, करण नेहरे, विश्वनाथ नेहरे, संगीता सरनाईक, कमल केंग, रोहिणी रा. वाघ, वैशाली विधाते, रोहिणी वि. वाघ, चित्रलेखा तिडके, सारिका केंग, रुक्मिणी लहांगे आदी सदस्यांनी केली आहे.

जानोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत पेठ गल्लीमध्ये भरवस्तीत देशी दारू दुकान सुरू आहे. या दुकानापासून काही अंतरावर ग्रामपंचायत कार्यालय व बाजारपेठ आवार, गणपती मंदिर, महादेव मंदिर आहे. दारू प्यायल्यानंतर गणपती मंदिर, महादेव मंदिराजवळ अनेक मद्यपी बसतात. काही तर मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन अपशब्द वापरत धिंगाणा घालतात. दरम्यान, देशी दारू दुकानाच्या परवाना नूतनीकरणासाठी दरवर्षी ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला किंवा ठराव देणे बंधनकारक असते. हे दुकान स्थलांतरित करण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न होत असून, स्थानिकांना त्याचा त्रास होत असताना, कोणत्या नियमाच्या आधारे ठराव दिला जातो? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

देशी दारूचे दुकान भरवस्तीत असल्याने अनेक दुष्परिणामही जाणवत आहेत. कायदेशीर मार्गाचा अवलंब करत संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून कारवाई करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल. त्यात लवकरच यश येईल, याची खात्री आहे. – सुभाष नेहरे, सरपंच.

“”गावाची शांतता अबाधित राखण्यासाठी दारू दुकान स्थलांतरित करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. संबंधित विभागाला निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू.” – हर्षल काठे, उपसरपंच.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत : पहिल्याच बैठकीत दारू दुकानाच्या स्थलांतराचा ठराव मंजूर appeared first on पुढारी.

Exit mobile version