ग्रामपंचायत सरपंचपदाची सोडत : मालेगाव तालुक्यात ६३ गावात महिलाराज; मातब्बरांचा हिरमोड 

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (ता. ५) काढण्यात आली. ६३ ग्रामपंचायतींवर महिलाराज असेल. ६३ पैकी ४ ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती महिला, १० ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीच्या महिला, १७ ग्रामपंचायतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर ३२ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण असेल.

प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालय आवारात आरक्षण सोडत काढण्यात आली. २० फेब्रुवारीपर्यंत दोन टप्प्यात सरपंचपदाची निवडणूक होईल, असा अंदाज आहे. 

मातब्बरांचा हिरमोड

राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले निमगाव, सोनज, चिखलओहोळ, मुंगसे, करंजगव्हाण, सवंदगाव, भुईकोट, पाटणे, सौंदाणे, वजीरखेडे, वडनेर, ढवळेश्‍वर, पिंपळगाव, वनपट, दहिदी, वऱ्हाणे आदी गावे महिला आरक्षित झाल्याने मातब्बरांचा हिरमोड झाला. याउलट सोनज, पिंपळगाव यासह काही ठिकाणी मातब्बर नेत्यांनी आपल्या पत्नींना निवडणुकीत संधी दिल्याने या आरक्षणाचा त्यांना लाभ झाला आहे. आरक्षण सोडतीसाठी सरंपचपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार उपस्थित होते. ज्या गावांच्या महिला आरक्षण चिठ्ठ्या निघाल्या, तेथील मातब्बरांचा हिरमोड होताच त्यांनी आवारातून समर्थकांसह काढता पाय घेतला. यामुळे अखेरची आरक्षण चिठ्ठी काढेपर्यंत प्रांत कार्यालय आवार बऱ्यापैकी रिते झाले होते. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

महिला आरक्षित ग्रामपंचायती अशा : 
- अनुसूचित जाती महिला आरक्षित : निमगाव, एरंडगाव, सातमाणे, जळगाव (गा.) 
- अनुसूचित जमाती महिला : सावतावाडी, झाडी, सोनज, चिखलओहोळ, करंजगव्हाण, निंबायती, मुंगसे, वाके, गारेगाव, जेऊर. 
- नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला : भिलकोट, गिगाव, घाणेगाव, कौळाणे (गा.), खलाणे, नाळे, निमगुले (बुद्रुक), राजमाणे, रोंझाणे, सवंदगाव, वळवाडे, दुंधे, निळगव्हाण, पाटणे, सौंदाणे, जळगाव (निं.), कोठरे बुद्रुक.- सर्वसाधारण महिला : वजीरखेडे, कजवाडे, वडनेर, माणके, भारदेनगर, शिरसोंडी, ढवळेश्‍वर, तळवाडे, अजंदे, लखाणे, शेरुळ, सावकारवाडी, येसगाव बुद्रुक, डोंगराळे, पिंपळगाव, निमगाव खुर्द, निमशेवडी, कंक्राळे, गाळणे, घोडेगाव, वनपट, चौकटपाडे, दहिदी, सीताणे, मांजरे, गुगुळवाड, नांदगाव बुद्रुक, वऱ्हाणे, बेळगाव, पाडळदे, लेंडाणे, साजवहाळ. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

१२५ ग्रामपंचायतींचे महिला आरक्षण असे : 
अनुसूचित जाती - ४ 
अनुसूचित जमाती - १० 
नागरिकांचा मागास प्रवर्ग - १७ 
सर्वसाधारण - ३२ 
---------------------------- 
एकूण - ६३