Site icon

ग्रामपंचायत : हरकतींसाठी आज मुदत; शुक्रवारी अंतिम यादी होणार प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 196 ग्रामपंचायतींमधील मतदारांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मंगळवारी (दि.18) अखेरची मुदत आहे. दरम्यान, तालुका स्तरावरून शुक्रवारी (दि.21) अंतिम याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल.

राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापन झालेल्या अशा सात हजार 649 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदारयादीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यात जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि.13) प्रारूप याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. दरम्यान, हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मंगळवारी (दि. 18) अंतिम मुदत आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये तहसीलदार त्यांच्या स्तरावर दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेत शुक्रवारी (दि. 21) अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करतील. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये 88, तर नुकताच 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा बसला आहे. त्यातच आता तब्बल 196 ग्रामपंचायतींचा मतदारयादी कार्यक्रम सुरू आहे. दिवाळीनंतर लगेचच या सर्व ठिकाणी निवडणुकांचा रणसंग्राम रंगण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

ग्रामपंचायतींची संख्या अशी…
चांदवड : 35, बागलाण : 41, येवला : 07, इगतपुरी : 02, नांदगाव : 15, कळवण : 16, त्र्यंबकेश्वर : 01, निफाड : 20, मालेगाव : 13, नाशिक : 14, देवळा : 13, दिंडोरी : 06, पेठ : 01, सिन्नर : 12. एकूण 196.

हेही वाचा :

The post ग्रामपंचायत : हरकतींसाठी आज मुदत; शुक्रवारी अंतिम यादी होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Exit mobile version