ग्रामीण वित्तपुरवठ्याचा चाळीस लाख कोटींचा टप्पा; 20 कोटी महिलांचे सक्षमीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – देशातील आघाडीच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (एनबीएफसी) ग्रामीण भागाला वित्तपुरवठा करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या नुकत्याच प्रकाशित अहवालानुसार डिसेंबर २०२३ अखेर एनबीएफसी कंपन्यांनी तब्बल 40 लाख कोटी रुपयांचा कर्जपुरवठा ग्रामीण भागाला केला आहे. शेती, वाहन खरेदी तसेच ग्रामीण भागातील लघु आणि मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा करण्यात एनबीएफसींनी बँकांहून सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे देशातील आर्थिक समावेशनाला चालना मिळाली असून, सा़डेआठ टक्के जीडीपी गाठणे शक्य होणार असल्याचा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

एनबीएफसीचे हे यश म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामीण उद्योजकांना आणि लहान व्यवसायमालकांना सक्षम करण्याच्या या कंपन्यांच्या वचनबद्धतेचा खास पुरावा आहे. आर्थिक समावेशन आणि ग्रामीण विकासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करताना, एनबीएफसी कंपन्या ग्रामीण समुदायाला वित्तपुरवठ्याचे सुलभ पर्याय प्रदान करण्यात आघाडीवर आहे.

एनबीएफसी कंपन्यांमध्ये सरकारी आणि खासगी अशा विविध संस्थांचा समावेश होतो. सूक्ष्म-वित्त, फिनटेक यांसारख्या कंपन्यांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागाला सहज वित्तपुरवठा उपलब्ध होत आहे. मार्च २०२३ अखेर एकूण ५३२ एनबीएफसी कंपन्यांची नोंद सरकारकडे आहे. यातील अनेक कंपन्यांची राज्यक्षेत्र ही तीन ते चार राज्यांपुरती मर्यादित असल्याने या कंपन्यांना ग्राहकांची साखळी उभारणे, त्यांची जोखीम तपासणे, कर्जरूपी वित्तपुरवठा करणे आणि योग्य पद्धतीने त्याची वसुली करणे सोपे जात आहे. कंपन्यांनी आपले लक्ष विशिष्ट भागांवर केंद्रित केल्याने मर्यादित शाखाविस्तार तसेच ग्राहक संपर्क केंद्रांच्या माध्यमातून त्यांचे कामकाज अतिशय सुरळीत सुरू आहे.

एनबीएफसी कंपन्यांनी रिटेल ग्राहकांना केलेल्या वित्तपुरवठ्यात २०२१ पासून २५ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे. २०२१ मध्ये २६.५ टक्के, २०२२ मध्ये २६.४ टक्के, तर २०२३ मध्ये २९.५ टक्के वाढ झालेली आहे.

वीस कोटी महिलांचे सक्षमीकरण

ग्रामीण भागातील २० कोटी महिला उद्योजकांना एनबीएफसी कंपन्यांनी कर्जपुरवठा करत त्यांच्या सक्षमीकरणाला हातभार लावला आहे. महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच त्याचा विस्तार करण्याबरोबरच त्याआधारे आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्य प्रदान करत सक्षम केले आहे.

मध्य भारतावर लक्ष केंद्रित

एनबीएफसीसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा ही राज्ये प्रमुख वाढीची भौगोलिक क्षेत्रे ठरली आहेत. ग्राहकांशी सातत्यपूर्ण आणि सक्षम हितसंबंधाआधारे वाटचाल करणाऱ्या या बाजारपेठा कंपनीसाठी वाढ दर्शविणाऱ्या बाजारपेठा राहण्याची अपेक्षा आहे. आपल्या बहुतांश ग्राहकांबरोबर या कंपन्यांनी वित्तपुरवठादार म्हणून आपले वैशिष्ट्य राखले आहे.

आठ लाख कर्मचारी कार्यरत

एनबीएफसी कंपन्यांमध्ये सुमारे आठ लाख कर्मचारी सध्या विविध पातळींवर काम करत आहेत. योग्य ग्राहकांची निवड करणे, ग्राहकांशी हितसंबंध कायम राखणे आणि कर्जाबाबत शिस्त निश्चित करणे यांवर हे मनुष्यबळ दिवसरात्र काम करत आहे. हेच घटक व्यवसायाचे मॉडेल टिकवून ठेवण्यात अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.

हेही वाचा: