घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार थांबवणार, राज्यभर करणार जनजागृती : मेघा शर्मा

धुळे www.pudhari.news

धुळे पुढारी वृत्तसेवा– देशात घरगुती स्वयंपाकाकरिता वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलींडरमधून अवैधरित्या गॅस काढून तो काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरु आहे. यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही. सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबावा यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून प्रशासनाला यासाठी पुरावेदाखल तक्रारी देण्यात येत असल्याची माहिती ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या मेघा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत  शर्मा बोलत होत्या. घरगुती वापरातील इंधनाचा सध्या सुरु असलेला काळाबाजार, यातून केंद्र सरकारचे होत असलेले नुकसान आणि नागरिकांच्या जीवाला होत असलेला संभाव्य धोका लक्षात घेता ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्यावतीने राज्यभर जनजागृती केली जात आहे. या अनुषंगाने धुळ्यातही फाऊंडेशनने ही मोहीम सुरु केली असून त्याबाबत मेघा शर्मा यांनी पत्रपरिषदेत खुलासेवार माहिती सादर केली. यावेळी संघटनेचे रोहित पवार, कृष्णा पवार, अंकुर वासावा हे देखील उपस्थित होते. श्रीमती शर्मा म्हणाल्या की, घरगुती वापरातील गॅसचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. व्यावसायिक सिलींडर ऐवजी राजरोसपणे घरगुती सिलेंडरचा वापर हॉटेल्स, दुकाने येथे केला जात आहे. विशेष म्हणजे घरगुती सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस भरुन दिला जातो. ही प्रक्रिया अत्यंत धोकेदायक आहे. यामुळे आजवर अनेक दुर्घटना घडल्या असून अनेकांचा यात बळी गेला आहे तर काही जायबंदी झाले आहेत. सिलेंडरचे रिफीलींग करणे हा प्रकार धुळ्यासह इतर शहरांमध्ये बिनदिक्कतपणे सुरु आहे. त्यामुळे याविषयी जनतेत जागृती होणे गरजेचे आहे. आम्ही स्थानिक प्रशासनाला याबाबत अवगत केले असून आजवर अनेक शहरांमध्ये कारवाई देखील करण्यात आलेल्या आहेत. जनतेने या मोहिमेत सहभागी होऊन अशा प्रकारचा काळा बाजार सुरु असल्यास थेट फाऊंडेशनशी संपर्क करावा अथवा प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन श्रीमती शर्मा यांनी यावेळी केले.

हेही वाचा –

The post घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार थांबवणार, राज्यभर करणार जनजागृती : मेघा शर्मा appeared first on पुढारी.