घरट्याविना कलानगरला चिमण्यांची भरते शाळाच! पक्षीप्रेमीच्या सेवेचे फलित

म्हसरूळ (नाशिक) : सध्या सिमेंटच्या जंगलाने महानगरांना विळखा घातल्याने अलीकडे चिमण्या हद्दपार होत असताना कलानगर येथे घरट्यांविनाही चिमण्यांची शाळा पाहायला मिळते. पक्षीप्रेमी भीमराव राजोळे यांच्या पंधरा वर्षांच्या सेवेतून हे शक्य झाले आहे. 

रोजच भरते चिमण्यांची शाळा

दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील कलानगरमध्ये ३, अक्षर व्हिला रो-हाउसमध्ये ही चिमण्यांची शाळा भरते. पर्यावरणप्रेमी मुख्याध्यापक भीमराव राजोळे यांनी पंधरा वर्षांपूर्वी हा चिमण्यांचा संसार फुलवला होता. राजोळे यांनी पुठ्ठ्यांची खोकी वापरून चिमण्यांसाठी येथे एकूण २७ घरटी तयार करून ठेवली होती. त्यात सुमारे ४० चिमण्यांसह त्यांची पिलेदेखील राहत होती. राजोळे यांनी चिमण्यांसाठी येथे बाजरी, तांदळाच्या कण्या अशा खाद्याची व्यवस्था केली होती. सर्वसाधारणपणे वर्षापूर्वी त्यांच्या मोकळ्या भूखंडात पडत असलेल्या कचऱ्यामुळे त्या ठिकाणी उंदरांचे प्रमाण वाढले होते. 

पंधरा वर्षांच्या सेवेचे फलित असल्याची चर्चा

हे उंदीर रात्रीच्या वेळी घरट्यांना लक्ष्य करीत असत आणि चिमण्यांसाठी ठेवलेली बाजरी, तांदूळ, अंडे व पिल्लदेखील फस्त करीत. या उंदरांच्या त्रासाला कंटाळून राजोळे यांनी जवळपास पंचवीस घरटी काढून टाकली. सद्यःस्थितीत अवघी दोनच घरटी आहेत. परंतु तरीदेखील राजोळे यांनी फुलवलेला चिमण्यांचा संसार हा आजही पूर्वीसारखाच सुरू असून, रोज सकाळी चिमण्यांची शाळा सुरू आहे. त्यांचे रो-हाउस तसेच समोरील बंगल्याच्या निंबाच्या झाडावर चिमण्यांचा वास आहे. यातूनच पक्षीप्रेमी राजोळे यांच्या पंधरा वर्षांच्या सेवेचे फलित असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

छोट्या जागेत व्यवस्था 

राजोळे यांनी त्यांच्या रो-हाउसच्या छोट्याशा जागेत चिमण्यांसह इतर पक्ष्यांसाठीही अन्नाची व्यवस्था केली आहे. त्यांनी अनेक वेली-वृक्ष वाढविल्या आहेत. त्यामुळे चिमण्यांसह येथे बुलबुल, साळुंक्या, सनबर्ड आदी पक्षीही आकर्षित होत आहेत. तसेच सोनचाफा, गुळवेल, अजार, रोतराणी चिनी गुलाब, तुळशी आदी झाडे आहेत. राजोळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे परिसरातील इतर रो-हाउस, बंगले, सोसायटीमधील नागरिकही अनुकरण करीत आहेत. हे नागरिक पुठ्ठ्यांची घरटे बनवत चिमण्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची