घरफोडीच्या घटनांनी दहिवड, वाखारी हादरले! एकाच रात्रीत फोडली सात घरे

देवळा (जि.नाशिक) : देवळा तालुक्यातील दहिवड व वाखारी येथे शनिवारी (ता. १६) रात्री घरफोडीच्या सात घटना घडल्याने ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण आहे. बंद घरे फोडण्याचे धोरण चोरट्यांनी अवलंबल्याचे दिसून येते. यातील फक्त एकाच चोरीच्या घटनेची नोंद देवळा पोलिसांत झाली आहे. 

दहिवड येथे एकाच गल्लीतील तीन घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना रविवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली. या तिन्ही कुटुंबातील व्यक्ती बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली आहे. अरुणा यशवंत कापडणीस यांनी देवळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातील ५२ हजार रुपये (एकूण दोन हजारांच्या २६ चलनी नोटा), १५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे वाळे आणि पायातील बेले असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला, तर त्यांच्यासमोरील सुखदेव शंकर दंडगव्हाळ यांच्या व बापू हरी पाठक यांच्या घरांच्यादेखील दरवाजांचे कुलूप कटरच्या सहाय्याने कापून आतमधील वस्तूंची शोधाशोध केली आहे. मात्र, घरमालक प्रत्यक्ष हजर नसल्याने घरातील काही ऐवज लंपास झाला की नाही ते कळू शकले नाही. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

वाखारीत चार ठिकाणी चोरी 

वाखारी येथे पिंपळेश्‍वर ग्रामीण पतसंस्था, यशवंत शिरसाठ यांचे घर, पोस्ट ऑफिस व डॉ. संजय शिरसाठ यांचा दवाखाना अशा चार ठिकाणी कुलपे तोडत चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, चोरट्यांच्या हाती जास्त काही न लागल्याने किरकोळ वस्तू व रक्कम चोरीस गेली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, पोलिस कर्मचारी अशोक फसाले, किरण पवार आदी तपास करीत आहेत. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

तोडलेली कुलपेही नेली सोबत 

चोरट्यांनी दहिवड व वाखारी येथे एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या केल्या. बंद घरांचे कुलूप तोडून मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे तोडलेली सर्व कुलपे चोरटे सोबत घेऊन गेले. चोरट्यांचा हा नवा फंडा पाहून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.