घरांच्या किमती घटतील की वाढतील? मुंबईवगळता संपूर्ण राज्यासाठी नियमावली

नाशिक : एफएसआयच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत बाल्कनी, लॉबी, जिन्याचे क्षेत्र मूळ ‘एफएसआय’मध्ये समाविष्ट करताना त्यावर बाजारमूल्य तक्त्याच्या पंधरा टक्के दर आकारून शासनाने उत्पन्नाची नवे साधननिर्मिती केली आहे. हा खर्च ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार असल्याने घरांच्या किमती कमी होतील, हा बांधलेला अंदाज खोटा ठरण्याचीच दाट शक्यता आहे.

अतिरिक्त एफएसआयसाठी प्रीमियम शुल्क 

बाजारमूल्य दर ज्या भागात अधिक असतील, त्या भागातील घरांच्या किमती अधिक वाढणार आहेत. मुंबईवगळता संपूर्ण राज्यासाठी राज्य शासनाने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली अमलात आणण्याचा निर्णय घेतला असून, त्याला मान्यताही देण्यात आली आहे. नियमावलीत ‘एफएसआय’चा गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मूळ एफएसआय, टीडीआर, मार्जनिल एफएसआय, इन्सेटिव्ह एफएसआय आदींची गणितीय सूत्रे स्पष्ट करण्यात आली आहेत. नाशिक शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बाल्कनी, जिना, पर्यायी गच्ची फ्री एफएसआयमध्ये गणले जाते.

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

निम्मा-निम्मा महसूल

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीनुसार आता या सर्व बाबी मूळ ‘एफएसआय’मध्ये गणल्या जाणार आहेत. याचाच अर्थ ‘एफएसआय’ कमी होणार आहे. अतिरिक्त ‘एफएसआय’साठी प्रीमियम शुल्क आकारले जाणार आहे. त्यासाठी बाजारमूल्य तक्त्याच्या पंधरा टक्के दर आकारला जाणार आहे. एखाद्या भागात एक हजार रुपये प्रतिचौरस मीटर असा दर असेल, तर त्यावर पंधरा टक्के म्हणजे दीडशे रुपये असा दर अतिरिक्त ‘एफएसआय’साठी असेल. शासनाने उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे पाहिले आहे. प्राप्त महसुलामधून शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेला निम्मा-निम्मा महसूल मिळणार आहे. 

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

ग्राहकांवर बोजा 
यापूर्वी फ्री एफएसआयमध्ये असलेल्या बाबींवर आता प्रीमियम शुल्क आकारले जाणार असल्याने त्याची वसुली ग्राहकांकडून होणार आहे. त्यामुळे घरांच्या किमती कमी होणार नाही, तर वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये या बाबी निशुल्क झाल्या असत्या, तर खर्च कमी झाला असता व घरांच्या किमतीही काही प्रमाणात घटण्यास मदत झाली असती. 

अधिक दर, अधिक किंमत 
शहरात बाजारमूल्य दर शिवारानुसार वेगवेगळे आहेत. कॉलेज रोड, गंगापूर रोड भागातील बाजारमूल्याचा दर अधिक, तर अन्य भागात तुलनेने कमी आहे. अतिरिक्त एफएसआयसाठी प्रीमियम शुल्क अदा करताना ज्या भागात अधिक किंमत मोजावी लागेल, तेथे घरांचे दर चढेच राहणार आहेत. 
 

 

बाल्कनी, जिना आदींसाठी यापूर्वी फ्री एफएसआय होता. नवीन नियमावलीमध्ये आता मूळ ‘एफएसआय’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अतिरिक्त ‘एफएसआय’ घेताना त्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. -अनिल आहेर, संचालक, परफेक्ट बिल्डकॉन