घरोघरी आता मातीच्या चुली! गॅस सोडून चुलीकडे वळताएत मेटाकुटीस आलेला महिलावर्ग

दिंडोरी (जि.नाशिक) : कोरोनाची समस्या अद्याप संपलेली नसताना त्यात आता आणखी एक संकट आल्यामुळे महिला आता मातीच्या चुलीकडे वळाल्या आहेत. काय आहे नेमके कारण?

चुलीवर स्वयंपाक करण्याकडे गृहिणींचा कल 
पूर्वी केंद्र शासन व राज्य शासनाच्या अंदाजपत्रकाच्या निमित्ताने वर्षातून एकदाच रॉकेल, गॅसच्या किमती वाढत होत्या. सध्या राज्य व केंद्र यांच्यात समन्वय नसल्याने वर्षातून अनेकदा पेट्रोलजन्य पदार्थांची दरवाढ होते. गॅसच्या किमती तर गगनाला भिडल्या आहेत. सामान्यांना गॅस, रॉकेल परवडत नाही. शिवाय, पैसे देऊनही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणी आपल्या मातीच्या चुली सुधारण्याकडे लक्ष देत आहेत. आता गावागावांतून धूर दिसू लागला आहे. इंधनासाठी शेतकऱ्यांनी बांधावरील वृक्षांची तोड सुरू केली आहे. एका बाजूला शासन दर वर्षी जून, जुलैमध्ये लाखो रुपये खर्च करून वृक्षलागवड करीत आहे. त्यामुळे हे गणित कसे बसणार, हा प्रश्‍न आहे. 

मातीच्या चुलीकडे वळाल्या महिला

वर्षातून वारंवार होणाऱ्या पेट्रोलजन्य पदार्थ, रॉकेल, गॅसच्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील गृहिणी आता मेटाकुटीला आलेल्या आहेत. कोरोनाची समस्या अद्याप संपलेली नसताना झालेली गॅस दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने इंधनासाठी महिला आता मातीच्या चुलीकडे वळाल्या आहेत.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

इंधन दरवाढीमुळे खर्चात बचत करण्यासाठी प्रयत्न 
सामान्यांकडे इंधनासाठी आर्थिक व्यवस्था नसेल तर तो वृक्षतोड करून आपली गरज भागविण्यासाठी प्रयत्न करतो, हे गणित आहे. मात्र, आगामी पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. पेट्रोलजन्य पदार्थांत विशेषतः गॅस व रॉकेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ थांबवून त्या स्थिर ठेवण्याची नागरिकांची अपेक्षा आहे.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच