घर खरेदी करताय… त्यापूर्वी महापालिकेकडून खात्री करा; आयुक्तांचा अभिनव उपक्रम 

नाशिक : सर्वसामान्य व्यक्तींसाठी घर एक स्वप्न असते. गृहस्वप्न पूर्ती करताना अनेकदा फसवणुकीला सामोरे जावे लागते. त्यातून मानसिक ताणतणाव निर्माण होऊन कुटुंबे उद्‌ध्वस्त होत असल्याचे प्रकार घडतात. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सर्वसामान्यांची गृह खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी थेट नगररचना विभागाच लोकांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.

घर घेण्यापूर्वी नियमात आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी महापालिकेने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार असून, गृहखरेदी करणाऱ्या ग्राहकांनी मागणी केल्यास नगररचनाचे अधिकारी जागेवर जाऊन प्रकल्पाची पाहणी करून घर घेण्याचा सल्ला देणार आहेत. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

नागरिकांच्या सर्व समस्या सोडवल्या जाणार

शहरामध्ये घरे बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत परवानगी दिली जाते. इमारत किंवा घर उभारण्यासाठी जागा निवासी क्षेत्रात आहे का? जागेवर कुठले आरक्षण तर नाही ना? जागा आर्टिलरी सेंटरच्या फनेल झोनमध्ये आहे का? इमारतीचा आराखडा विकास नियंत्रण नियमावलीनुसार आहे का? वास्तुविशारदांमार्फत इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे का? जागेवर एखादा नाला किंवा अन्य नैसर्गिक स्त्रोत आहे का? इमारतीचे सामासिक अंतर, योग्य रस्त्यावर बांधली जात आहे का? जागा मालकांमधील वाद न्यायालयात आहे का? विकास शुल्क किंवा अन्य कर भरले आहे की नाही? याची तपासणी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. त्यानंतरच बांधकाम परवानगीचा दाखला दिला जातो. इमारत पूर्णत्वास आल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. त्यापूर्वी नगररचना विभागाचे अधिकारी स्थळपाहणी करून सामासिक अंतराचे मोजमाप करतात. त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला संबंधितांना देतात. बहुतेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होते. तक्रार दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून इमारत अधिकृत की अनाधिकृत ठरविली जाते. त्यातून सर्वसामन्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मानसिक धक्का बसतो. त्यातून कौटुंबिक समस्या निर्माण होतात. प्रत्येक ग्राहकाला वकिलांचा सल्ला घेणे परवडेलच असे नाही. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार

अशी टळेल फसवणूक 

घर खरेदी करण्यापूर्वी महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास महापालिकेचे कनिष्ठ अभियंते जागेवर जाऊन इमारतीची पाहणी करतील. त्यानंतर इमारत किंवा घर अधिकृत आहे की नाही, याबाबत सल्ला देतील. यातून भविष्यातील फसवणूक टळेल. 

 
घर खरेदी करताना अनेकांना तांत्रिक बाबींची माहिती नसते. त्यातून फसवणूक होण्याचे प्रकार घडतात. यापूर्वी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत इमारतींमध्ये घरे विक्रीच्या तक्रारी प्राप्त झाल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी योजना राबविली जाणार आहे. 
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका