घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’

घऱ बांधणे,www.pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे
गेल्या मार्च महिन्यात स्टील, सिमेंटसह बांधकाम साहित्यात 25 ते 30 टक्के वाढ झाल्याने घरांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता बांधकाम साहित्यात बर्‍यापैकी घसरण झाली असून, घर बांधणे स्वस्त झाले आहे. मात्र, अशातही घरांच्या किमती जैसे थेच असल्याने, स्वस्त घर खरेदीचे ग्राहकांचे स्वप्न अधुरेच असल्याचे दिसून येत आहे.

सध्या प्रत्येक क्षेत्रात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यास रिअल इस्टेट क्षेत्रही अपवाद नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत घर बांधण्यासाठी लागणार्‍या साहित्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरांच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकामांची गती मंदावत असल्याने, पुरवठ्याच्या तुलनेत मागणी कमी होते. परिणामी, सर्वच साहित्याच्या किमती या काळात घसरतात. सध्या स्टील, सिमेंट, बारसह इतर साहित्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. मार्चमध्ये स्टीलच्या किमती 83 हजार प्रतिटनांपर्यंत गेल्या होत्या. आता या किमती 60 हजार प्रतिटनापर्यंत खाली आल्या आहेत. सिमेंटच्या दरात बर्‍यापैकी घसरण झाली आहे. अर्थात सिमेंटच्या विविध कंपन्या असून, त्यांच्या बॅगच्या किमतींमध्ये तफावत आहे, तरी मार्चमध्ये सरासरी 450 रुपयांना मिळणारी बॅग आता 380 रुपयांपर्यंत मिळत आहे.

विटा वाळूचे दर स्थिर 

मार्च महिन्यात विटा, वाळूचे जे दर होते, तेच दर आजही कायम आहेत. दिलासादायक बाब म्हणजे विटांसाठी कच्च्या मालाचा प्रचंड तुटवडा असतानाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ करण्यात आलेली नाही. वाळूंचे दरही स्थिर आहेत. सध्या चार इंच विटांसाठी 8 हजार रुपये प्रतिहजार नग, तर 6 इंच विटांसाठी 13 हजार रुपये प्रतिहजार नग असे दर आहेत. वाळू दीड हजार रुपये टन याप्रमाणे साडेसहा हजार रुपये ब—ास असा दर आकारला जातो.

वटांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा तुटवडा आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकलहरा येथून मिळणारी राख उपलब्ध होत नव्हती. त्याचबरोबर मातीचाही तुटवडा आहे. आता राख काही प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गंगापूर धरणातील गाळाची मातीही मिळत असल्याने, उत्पादन घेणे शक्य होत आहे. कोळशाचे दर वाढलेले असल्याने, कोळसा मिळवणे अवघड होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास, विटांचे दर पुढच्या काळात वाढू शकतात.
– गणेश आहेर, वीटभट्टी मालक

विटा, वाळूंच्या किमतींमध्ये फारशी घसरण झाली नसली, तरी त्यात कोणत्याही प्रकारची वाढही झाली नाही. 4 इंच विटा आठ ते साडेआठ हजारांत प्रतिहजार नग याप्रमाणे मिळतात. तर 6 इंच विटांचे दर 13 ते 14 हजार प्रतिहजार नग याप्रमाणे आहेत. एकूणच सध्या बांधकाम साहित्याचे दर कमी झाले असून, घरांच्या वाढणार्‍या किमतीही कमी व्हाव्यात, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केलीजात आहे.

हेही वाचा :

The post घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’ appeared first on पुढारी.